पिंपरी : अर्धे वर्ष सरूनही  मेट्रोची कामे संपेनात ! | पुढारी

पिंपरी : अर्धे वर्ष सरूनही  मेट्रोची कामे संपेनात !

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी ते फुगेवाडी हे 5.8 किलोमीटर अंतर मेट्रो धावण्यास सुरुवात होऊन अर्धे वर्ष पूर्ण झाले तरीही, अद्याप बहुतांश स्टेशनची कामे सुरूच आहेत. महामेट्रोच्या संथ गती कारभारामुळे नागरिकांसह वाहनचालक वैतागले आहेत. दुसरीकडे, अर्धवट मार्गावर प्रवास करण्यास नागरिकांनी पाठ फिरविली आहे.

कामे पूर्ण झालेली नसताना घाईघाईत पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो 6 मार्च 2022 ला सुरू करण्यात आली. सुरुवातीला नागरिकांनी उत्सुकता म्हणून सहकुटुंब मेट्रो सफरीचा आनंद घेतला. मेट्रोची नवलाई संपल्यानंतर नागरिकांनी प्रवासाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. प्रत्येकी दहा मिनिटांनंतरची एक फेरी 30 मिनिटांवर आली आहे. तर, दोनऐवजी एकच मेट्रो पळविली जात आहे. अनेकदा मेट्रो रिकामीच फिरत असल्याचे दृष्टीस पडत आहे.

प्रवाशांचा घटत चाललेला प्रतिसाद दुसरीकडे, सहा महिने होऊनही अद्याप स्टेशनची कामे सुरूच आहेत. संत तुकारामनगर मेट्रो सोडल्यास पिंपरी, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी या स्टेशनची कामे सुरूच आहे. विशेषत: स्टेशनला जोडणार्‍या जिने व लिफ्टची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते बंद केले जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत फुगेवाडी ते दापोडी या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. दापोडी स्टेशनवरील जिन्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी ते दापोडी अशी मेट्रो धावेल. त्या पुढे बोपोडी, खडकी, रेंजहिल्स येथील कामे संथ गतीने सुरू असल्याने शिवाजीनगर व स्वारगेटपर्यंत मेट्रो पोहोचण्यास वर्षभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

975 क्षमतेच्या डब्यात एका फेरीत केवळ 82 प्रवाशांचा प्रतिसाद
सहा मार्च ते 5 सप्टेंबर 2022 या 183 दिवसांच्या कालावधीत एकूण 4 लाख 5 हजार 396 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यात काहींनी एकापेक्षा अधिक वेळा प्रवास केला आहे. सध्या तीन कोचची (डब्बे) मेट्रो धावत आहे. एका कोचची प्रवासी क्षमता 325 आहे. एकूण 975 प्रवासी एका फेरीत प्रवास करू शकतात. दररोज सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत एकूण 27 फेर्‍या होतात. प्रवाशांच्या आकडेवारीनुसार गेल्या 183 दिवसांत सरासरी एका फेरीस केवळ 82 प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. याचा अर्थ डब्यात 893 प्रवासी संख्या कमी होते.

गर्दीसाठी इव्हेंटचा फंडा
नागरिकांचा प्रतिसाद घटत असल्याने महामेट्रोने आता एका फेरीसाठी 5 हजार रुपये भरून इव्हेंट आयोजित करण्यास परवानगी देण्याचा फंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेट्रोत पुस्तक प्रकाशन, काव्यसंमेलन, ढोल वादन, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे असे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. मेट्रोत इव्हेंट साजरा करण्यास प्रतिसाद मिळत आहे.

ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा दावा
फुगेवाडी ते शिवाजीनगरपर्यंतची उर्वरित सर्व कामे ऑक्टोबर 2022 पर्यंत म्हणजे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कामे वेगात पूर्ण केली जात आहेत. काम पूर्ण होताच मेट्रोचे अंतर वाढविले जात आहे. मार्गिकेचे काम झाल्याने तसेच, प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाल्याने मेट्रो सुरू करण्यात आली. त्यात कोणतीही घाई झाली नाही. अनेक जण कामासाठी मेट्रोचा नियमित प्रवास करीत आहेत. नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन सेवेत काही बदल करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून शिवाजीनगर, स्वारगेट, वनाज व रामवाडी अशी पुणे शहराशी कनेक्टिव्हिटी वाढल्यास मेट्रो प्रवासाला नागरिकांचा प्रतिसाद वाढेल, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

Back to top button