पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला येणार वेग | पुढारी

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला येणार वेग

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. यातील काही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर, काही परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार, याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीईटी सेलच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीईटी सेलमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यामधील बी.एड.-एम.एड, बी.पी.एड., विधी पाच वर्षे, एम.एड, विधी तीन वर्षे, बी. ए, बी.एस्सी बी.एड, एमसीए, एमएचटी-सीईटी, एमबीए/ एमएमएस, आणि बी. एड (सामान्य व विशेष) या प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचे वेळापत्रक राज्य सीईटी कक्षाच्या संकेत स्थळावर 10 सप्टेंबरला जाहीर करण्यात आले आहे.

तसेच बी.ए. बी.एड., बी.एड -एम.एड, बी. एचएमसीटी, बी. प्लॅनिंग, एम. आर्च एम.एचएमसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित परीक्षांचा निकालही लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. अशा अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहेत.

अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे एमएचटी सीईटीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. संबंधित सीईटीचा निकाल 15 सप्टेंबरपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात होणार असल्याचे दिसून येत आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल. बीए, बी-कॉम, बीएसस्सी अशा पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयीन स्तरावर पूर्ण होऊन, महाविद्यालये सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे वर्गांमध्ये नियमितपणे तासिका होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत.

सीईटीचा निकाल 15 लाच
अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक एमएचटी सीईटीच्या पीसीएम ग्रुपसाठी 2 लाख 82 हजार 146 विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आले. त्यातील 2 लाख 31 हजार 34 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, 51 हजार 112 विद्यार्थी गैरहजर राहिले. 1 हजार 54 विद्यार्थ्यांनी पूनर्परीक्षा दिली. पीसीबी ग्रुपसाठी 3 लाख 23 हजार 869 विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आले.

त्यातील 2 लाख 33 हजार 48 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, 90 हजार 821 विद्यार्थी गैरहजर राहिले. तर, 446 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली आहे. एमएचटी सीईटीच्या दोन्ही ग्रुपचा निकाल 15 सप्टेंबरलाच जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Back to top button