भिगवण : पोलिसाने केली चोराशीच तडजोड! फिर्यादी ठरला चोर आणि चोर ठरला साव

File Photo
File Photo

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: मागील 15 दिवसांपूर्वी वाहनचोराला सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, संबंधित पोलिसाने चक्क चोराशीच तडजोड केली. त्यामुळे फिर्याद देण्यास गेलेला नागरिक अपराधी झाला, तर चोर साव झाला. दि. 23 ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या या घटनेची वाच्यता आता सर्वत्र झाल्याने याचे बिंग फुटले आहे.

याचे झाले असे की, दि. 23 ऑगस्टच्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भिगवण पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बसस्थानकाजवळील एका प्रतिष्ठित नागरिकाची मारुती सुझुकी कंपनीची बलेनो गाडीची काच फोडून एक चोरटा वाहन चोरण्याचा प्रयत्न करीत होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर ही चोरी होताना नागरिक सावध झाल्याचे चोराच्या लक्षात येताच त्याने पळ काढला. मात्र, नागरिकांनी पकडून चोप देत त्याला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले.

वास्तविक, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेणे गरजेचे असताना माशी शिंकली आणि संबंधित पोलिसाने घूमजाव केले. चोराचे मेडिकल केले, तर तुम्हीच अडचणीत याल, अशी भीती घालत झालेली नुकसानभरपाई द्यायला लावतो, असे सांगत चोरट्याला सोडून दिले. संबंधित नागरिकाने गाडीची भरपाई मागणे सुरू केल्यानंतर आता मात्र आपला काही संबंध नाही, असे उत्तर मिळू लागले आहे. संबंधित पोलिसाने चोराला अभय दिल्याने एका सामान्य नागरिक हतबल होण्याची वेळ आली आहे.

पोलिस-नागरिक एकोपा संपला?
खरेतर भिगवण पोलिस व नागरिकांचा एकोपा वर्षानुवर्षे टिकून आहे. मात्र, वर्ष-दीड वर्षात भिगवण पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले काही पोलिस सतत घमेंडीत वावरताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांशी त्यांचे वर्तन चीड आणणारे ठरत आहे. सतत पोलिसी तोर्‍यात राहू लागल्याने आत्तापर्यंत नागरिक आणि पोलिसांमध्ये असलेल्या एकोप्यात अंतर पडू लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news