त्या दोन पोलिस निरीक्षकांचा मुक्काम ठाण्यातच ! पहिल्या दिवसापासून मिरवणूक संपेपर्यंत कर्तव्यावर | पुढारी

त्या दोन पोलिस निरीक्षकांचा मुक्काम ठाण्यातच ! पहिल्या दिवसापासून मिरवणूक संपेपर्यंत कर्तव्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘कर्तव्यापुढे आम्हा न तमा कुटुंबियांची’ असे ब्रीद अनुसरून विश्रामबाग व फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने आणि राजेंद्र लांडगे या दोघांनी तब्बल 12 दिवसाहून अधिकाळ पोलिस ठाण्यातच मुक्काम ठोकून आपले कर्तव्य बजावले. यावेळी सर्व पोलिस कर्मचारी व इतर अधिकारी देखील त्यांच्या मदतीला होते. प्रामुख्याने पुण्याचा गणेशोत्सव हा मध्यवस्तीत संपन्न होतो. मानाच्या गणपतीसह बहुतांश मंडळे याच परिसरात येतात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ताची मदार ही या दोन पोलिस ठाण्यावर असते. हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो.

त्यामुळे येथील दोन अधिकार्‍यांना मंडळांच्या अधिक्षकांपासून ते सर्व प्रशासकीय यंत्रणेपर्यंत समन्वय ठेऊन आपली कामगिरी बजवावी लागते. पुणे शहरातील गणेशोत्सवाची सर्वाधिक जबाबदारी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यावर पडते. या कालावधीत कोणत्याही विघ्नाविना उत्सव पार पाडण्यासाठी दोन्ही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी एकही दिवस घरी गेले नाही. 31 ऑगस्टनंतर शनिवारी रात्री मिरवणूक संपल्यानंतर ते आपल्या घरी परतले. उत्सवात काहीही कमी राहू नये दोन्ही निरीक्षकांनी योग्य ती काळजी घेतली. अर्थात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे कर्तव्य पार पाडले.

Back to top button