बेल्हे : राजुरी शिवारात चंदन चोरी | पुढारी

बेल्हे : राजुरी शिवारात चंदन चोरी

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा:  सोनेमळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड (गर असलेला भाग) तोडून नेल्याने परिसरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.  राजुरी गावच्या हद्दीत सोनेमळा असून मीना सोनवणे यांच्या राहत्या घरासमोरील स्वत:च्या मालकीचे सात वर्षांपूर्वीचे चंदनाच्या झाडाचा खालचा भाग कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी कापून नेला आहे. झाडाच्या वरील भाग तसाच ठेवण्यात आला आहे.

सोनवणे यांच्या घराच्या परिसरात सहसा कुणी जात-येत नाही. मीना सोनवणे यांनी उठल्यानंतर घराचा दरवाजा उघडला असता सकाळी घडलेला प्रकार लक्षात आला. घरासमोरील चंदनाचे झाड हे सकाळी तोडून नेले असल्याचे आढळले. गेल्या अनेक दिवसांपासून बेल्हे, राजुरी भागात चंदनचोर सक्रिय असून, आतापर्यंत चार ते पाच ठिकाणी चंदनाचे झाड चोरीच्या घटना घडल्या आहेत. चंदनाच्या झाडाची चोरी झाल्यावर तक्रार कुणाकडे करायची म्हणून शेतकरी तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे वनविभागाने या बेल्हे, राजुरी परिसरातील चंदनचोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 

 

Back to top button