बारामती : तरडोली, वाकीचा तलाव ‘ओव्हरफ्लो’; जोरदार पावसाचा परिणाम | पुढारी

बारामती : तरडोली, वाकीचा तलाव ‘ओव्हरफ्लो’; जोरदार पावसाचा परिणाम

बारामती; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील तरडोली व वाकी येथील तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. या तलावांतील पाण्याचे पूजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान, तलाव भरल्याने पाण्याची चिंता मिटली असून, शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तरडोलीच्या तलावावर परिसरातील पाच गावांतील नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. तलाव भरल्याने या योजनांना पाणी मिळणार असून शेकडो हेक्टरवरील शेतीला त्याचा फायदा होणार आहे. तरडोलीसह मासाळवाडी, माळवाडी, बाबुर्डी व मोरगावच्या काही भागाला याचा फायदा होईल. नाझरे धरण क्षेत्रासह या भागात जोरदार पाऊस झाल्याने हा तलाव भरला आहे. गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच हा तलाव भरला गेला. सांडव्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.

येथील जलपूजनप्रसंगी होळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सरपंच विद्या भापकर, सोमेश्वरचे संचालक किसन तांबे, नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे, संतोष चौधरी, संजय भापकर, हनुमंत भापकर, दत्तात्रय पुणेकर, सतीश गायकवाड, सर्जेराव गाडे आदी उपस्थित होते. वाकी येथील तलाव भरल्याने वाकीसह कानाडवाडी, चोपडज आदी भागांना फायदा होणार आहे. होळकर यांच्यासह तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, सरपंच किसन बोडरे, उपसरपंच ह. मा. जगताप, बापूराव गाडेकर, नितीन जगताप, अनिल भंडलकर आदींनी येथे जलपूजन केले.

Back to top button