वालचंदनगर : ‘माझ्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी अस्तरीकरणाला पाठिंबा’ | पुढारी

वालचंदनगर : ‘माझ्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी अस्तरीकरणाला पाठिंबा’

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील बावीस गावांतील शेतकर्‍यांनी निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणास पाठिंबा देण्यासाठी दि. 12 रोजी होणार्‍या रास्ता रोको आंदोलनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शेतकरी गाई बैलांसह आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकर्‍यांनी बैलाच्या अंगावर रंगरंगोटी करत अस्तरीकरणाला पाठिंबा दर्शविला आहे.

इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून बिकट आहे. प्रामुख्याने तालुक्यातील बावीस गावांचा पाणीप्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. सध्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत सुरू असलेल्या लढाईत अस्तरीकरणास पाठिंबा देणार्‍या शेतकर्‍यांची  संख्या मोठी आहे.

अशातच नीरा डाव्या कालव्याचे बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अस्तरीकरणाचे कामास काही शेतकर्‍यांनी विरोध करून काम बंद पाडले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील 22 गावातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथील शेतकर्‍यांचा नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला पाठिंबा आहे. दि. 12 रोजी 54 फाटा येेथे होत असलेल्या रास्तारोको आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी  होणार आहेत.

या भागातील शेतकर्‍यांनी आंदोलनाबाबत निमसाखर, निरवांगी, खोरोची, शिरसटवाडीमध्ये बैठका घेतल्या आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी स्वेच्छेने पुढे येताना दिसत आहेत. आंदोलनाची तयारी म्हणून निमसाखर येथील अक्षय तुळशीदास महानवर या शेतकर्‍याने बैलाच्या अंगावर रंगरंगोटी करून ‘माझ्या चार्‍यासाठी व माझ्या पाण्यासाठी अस्तरीकरणाला पाठिंबा’ असा संदेश लिहिला आहे.

याबाबत महानवर म्हणाले, आम्ही कालव्याच्या टेलला असल्यामुळे आम्हाला कायम उशीरा व कमी दाबाने पाणी मिळते. उन्हाळ्यात आमची पिके जळतात. कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे आम्ही जनावरासह रास्ता रोकोमध्ये सहभागी होऊन अस्तरीकरणास पाठिंबा देणार आहोत.

Back to top button