पिंपरी : शहरात ‘आव्वाज’ वाढला | पुढारी

पिंपरी : शहरात ‘आव्वाज’ वाढला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये गणेशोत्सव काळात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निश्चित मानकापेक्षा आव्वाज वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. शुक्रवारी (दि. 9) गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सर्वाधिक पिंपरी-शांतीनगर येथे 103.99 डेसिबल इतका आवाज नोंदविला गेला. सर्वात कमी आवाज भोसरी गावठाण येथे पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी (4 सप्टेंबर) 67.66 डेसिबल इतका नोंदविला गेला. तथापि, निवासी आणि वाणिज्य क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा हा आवाज जास्त असल्याने मानकाचे उल्लंघन झाले आहे.

गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा दणदणाट ऐकण्यास मिळाला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड शहरात तीन ठिकाणी ध्वनीची पातळी मोजली. चिंचवडगाव येथील चापेकर चौक, पिंपरी-शांतीनगर आणि भोसरी गावठाण आदी परिसराचा त्यामध्ये समावेश आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी (31 ऑगस्ट) सर्वप्रथम आवाज मोजला गेला. त्यानंतर दीड दिवस (1 सप्टेंबर), 5 दिवस (4 सप्टेंबर), 7 दिवस (6 सप्टेंबर) आणि दहाव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या (9 सप्टेंबर) दिवशी आवाज तपासण्यात आला. सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत प्रामुख्याने ही आवाजाची मर्यादा मोजली गेली.

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण (डेसिबलमध्ये)
दिनांक चापेकर चौक (चिंचवडगाव) शांतीनगर-पिंपरी भोसरी गावठाण
31 ऑगस्ट 82.92 72.25 80.94
1 सप्टेंबर 75.38 70.71 68.37
4 सप्टेंबर 76 69.41 67.66
6 सप्टेंबर 99.54 78.72 70.72
9 सप्टेंबर 80.62 103.99 70.59

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार आवाज मर्यादा
क्षेत्र दिवसा (डेसिबल) रात्री (डेसिबल)
औद्योगिक 75 70
वाणिज्य 65 50
रहिवाशी 55 45
शांतता क्षेत्र 50 40

Back to top button