भवानीनगर : सत्ता असो, नसो विकासाचे माझ्यावर सोडा; माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

भवानीनगर : सत्ता असो, नसो विकासाचे माझ्यावर सोडा; माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा: सत्ता असो वा नसो विकासकामांचे माझ्यावर सोडा. या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत. अजित पवार हे दादाच आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबतीत काळजी करू नका, असा विश्वास माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी परिसरातील ग्रामस्थांना दिला.

निंबोडी (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अ‍ॅड. रणजित निंबाळकर, दीपक निंबाळकर, हनुमंत घोळवे, पोलिस पाटील मनोज होडशीळ, ग्रामपंचायत सदस्य व लाकडी निंबोडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आ. भरणे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून देखील विकासासाठी मोठी मदत होते आहे.

काही लोकांना तुमच्या पाण्याचं, विकासाचं काही देणं-घेणं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. राजकारणाचं भांडवल करून ते स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम गेली 20 ते 25 वर्षांपासून करीत आहेत. निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. आमदार गप्प नसतो, माझं कार्यक्षेत्र बावड्याच्या कोपर्‍यापासून ते भवानीनगरपर्यंत आहे.

त्यामुळे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. या भागातच नाही तर बावड्याच्या पाटलांना देखील सायफन माहिती नव्हता, तेव्हा भरणेवाडीला सायफन माहिती होता. शेतात उसाची लागण सुरू झाल्यानंतर विजेची बोंब असायची. त्यामुळे दार्‍यावरच्या गड्याला जेवायला सोडावं लागायचं. त्यावेळी हा मामा हातात खोरे घ्यायचा. त्यामुळे शेतकर्‍यांचं काय दुःख असतं ते मला माहिती असल्याचे देखील या वेळी आ. भरणे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news