पुणे : शेतकर्‍यांना अतिवृष्टी, पुराचा फटका | पुढारी

पुणे : शेतकर्‍यांना अतिवृष्टी, पुराचा फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतक-यांना बसला. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जून महिना पावसाने ओढ दिली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी धुवाधार पावसाने अनेक भागात पूर आला. यामध्ये भात रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेती पिकासह कच्ची घरे, गोठ्यांची पडझड झाली.

अनेक शेतक-यांची लहान-मोठी दूधाळ जनावरे दगावली. याचा सर्वाधिक फटका जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील शेतक-यांना बसला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी शासनाकडे वाढीव रक्कमेसह 4 कोटी 53 लाख रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान गणेशोत्सवा दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून माहिती सादर करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने शेतक-यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी केली होती, परंतु हंगामच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची खरी सुरुवात झाली. परंतु अनेक ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस झाल्याने पूर आला. भाताची रोपे वाहून गेली, सलग 10 ते 15 दिवस पाऊस सुरू राहिल्याने रोपे सडून गेली. कच्च्या घरांची व गोठ्यांची पडझड झाली, शेती पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील अतिवृष्टीची नोंद झाली.

महसूल विभाग व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान शेतकरी व शेतीपिकांचे 4 कोटी 53 लाखांचे नुकसान झाले. यात शेती पिकांचे 3 कोटी 18 लाख रुपयांचे तर घरांची, गोठ्यांची पडझड 1 कोटी 20 लाख रुपयांची मागणी केली आहे. यात तीन महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतक-यांची तब्बल 302 लहान-मोठी दुधाळ जनावरे दगावली. यासाठी नुकसानभरपाई म्हणून 17 लाख 13 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 9 हजार 192 शेतक-यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

गणेशोत्सवात पावसाने दाणादाण
गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात बहुतेक सर्व तालुक्यात धुवाधार पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस होऊन झालेल्या प्रचंड पावसाने पूर येऊन शेतातील हाताशी आलेली शेतीपिके वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीचा फटका संपूर्ण जिल्ह्यालाच बसला असून, महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

Back to top button