खेड तालुक्यात लम्पीवरील लस तातडीने उपलब्ध करा; शरद बुट्टे पाटील यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

file photo
file photo

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा: पाईट येथे शेतकरी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर खेड तालुक्याला तातडीने लम्पी लस उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांच्याशी (दि. ९) फोनवरून चर्चा करण्यात आली. यावेळी खेड तालुक्यासाठी जवळपास २५ ते ३० हजार लसीच्या डोसची गरज असल्याने ती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.

राज्य पातळीवरून पुणे जिल्ह्याला लस उपलब्ध करून द्यावी यासाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी देखील संपर्क केल्याचे सांगून बुट्टे पाटील म्हणाले, पुण्याचे जिल्हाधिकारी यांना तातडीने ईमेलद्वारे पत्र देऊन लस उपलब्ध करावी. तसेच दुभत्या गाई, म्हशी व बैलांच्या किमती मोठ्या असल्याने सधन शेतकरी खासगी लसीकरण करून घेत आहेत. परंतु गरीब शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी लस मिळणे गरजेचे आहे. तसेच जनावरांमध्ये लम्पी आजाराचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत १८ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. सध्या एकही जनावर दगावले नसले तरी करंजविहिरेच्या तळशेत येथील एका जनावराची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे.

खेड तालुक्यात आतापर्यंत करंजीविहिरे, पाईट, रोहकल, चऱ्होली, किवळे, वाळद या ६ ठिकाणी जनावरांना लम्पी आजार झाला आहे. ईपी सेंटर म्हणजेच लम्पी लागण झालेल्या जनावरांचे ठिकाणापासून ५ कि.मी.परिसरासाठी झोन तयार केले आहेत. ५ कि.मी. परिसरातील जनावरांची संख्या जवळपास ३३ हजार असून या जनावरांचे लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे. परंतु पशुसंवर्धन विभागाला आतापर्यंत फक्त ६ हजार डोस उपलब्ध झालेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्व:खर्चाने लस खरेदी करून आतापर्यंत २० हजारहून अधिक जनावरांना लसीकरण करून घेतले आहे. अजून तालुक्याला २५ ते ३० हजार लम्पी डोसची आवश्यकता असल्याचे बुट्टे पाटील यांनी पाईट येथे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news