

पुढारी वृत्तसेवाः वालचंदनगर पोलिसांनी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील लासुर्णे,वालचंदनगर भागातून चोरीच्या वाळूची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये १० लाख रुपयांची वाहने व दोन ब्रास वाळू जप्त करुन चौघांजणावर वाळू चोरी व पर्यावरण अधिनीयम कलम आणि सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि. ७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लासुर्णे गावामधून चार चाकी वाहनामधून चोरीच्या वाळूची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या बाळू शेख ( वय – २४,रा.लासुर्णे) याच्या गाडीवर छापा टाकून गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ४ लाख रुपयांची चार चाकी गाडी व सहा हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा ४ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. गुरुवार (दि.७) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर- जंक्शन रस्त्यावरुन वालचंदनगर येथील गार्डन चौकामध्ये बेकायदेशीर वाळूची वाहतुक केल्याप्रकरणी पोलिसांनी रोहित सुनिल सोनवणे , सुनिल किसन सोनवणे ( रा. नारळीबाग वालचंदनगर) व स्वप्निल मडके (रा.कळंब) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यांच्याकडून पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचे वाहन व ६ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा ६ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.