बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात निरा नदी दुथडी भरून, सांगवीला मोठ्या पावसाची हुलकावणी | पुढारी

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात निरा नदी दुथडी भरून, सांगवीला मोठ्या पावसाची हुलकावणी

सांगवी, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये मंगळवारी (दि. 6) रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाच्या व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने सांगवी येथील निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र सांगवी भागाला दोन अपवाद वगळता एकही मोठा पाऊस झालेला नाही. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी होत असते, परंतु जोरदार पाऊस काही पडेनासा झाला असून, कायम हुलकावणी देत आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील निंबुत व निरा (ता. पुरंदर) परिसरातील गावांमध्ये मंगळवारी अक्षरशः ढगफुटीने हाहाकार उडाला असून, ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक बंद होऊन शेतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागातील ओढ्यांचे पाणी निरा नदीपात्रात येते. या पावसाचे पाणी अधिक वीर धरणातून सोडलेले 5 हजार 600 क्युसेक पाणी असे मिळून सांगवी येथील निरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

या उलट सांगवी परिसरात संपूर्ण पावसाळ्यात 1 जून रोजी 33 मिलिमीटर व 5 ऑगस्ट रोजी 55 मिलिमीटर असे दोनच मोठे पाऊस झाले आहेत. या भागात दररोज आकाशात नुसत्याच काळ्याकुट्ट ढगांची दाटी झालेली पहायला मिळते. परंतु बुधवारी (दि. 7) दुपारी चार वाजेपर्यंत एकही मोठा पाऊस झाला नाही. काही दिवसांपूर्वी या भागातील शेतातील उभी पिके पाण्याला आली होती. मागील आठवड्यात या भागातील शेतीसाठी निरा डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्या वेळी बहुतांश शेतकर्‍यांनी पिकांना पाणी दिले. नंतर हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले. एकूणच एकीकडे ढगफुटीसदृश परिस्थिती आणि दुसरीकडे पावसाची हुलकावणी या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी गर्तेत सापडलेल्या अवस्थेत दिसत आहे.

Back to top button