जिल्ह्यात अधिकार्‍यांच्या जिवावर राजकारण, बारामतीच्या संघटनात्मक बैठकीत भाजप नेत्यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार | पुढारी

जिल्ह्यात अधिकार्‍यांच्या जिवावर राजकारण, बारामतीच्या संघटनात्मक बैठकीत भाजप नेत्यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती येथे पार पडलेल्या पुणे ग्रामीण भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीत माजी मंत्र्यांसह आमदारांनी जिल्ह्यात अजूनही अधिकार्‍यांच्या जिवावर काहींचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. राज्यात सत्ताबदल झालेला असला, तरी जिल्ह्यातील अधिकार्‍यांना अजून ते बदललेले वाटत नाहीत. अशा अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी
या वेळी नेतेमंडळींनी केली आहे.

भाजपचे बारामती लोकसभेचे प्रभारी आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, आमदार गोपीचंद पडळकर या सर्वच नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. शिंदे म्हणाले की, मी लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्राचा दौरा केला. संघटना मजबूत करून कार्यकर्त्यांना आपल्याला ताकद द्यावी लागेल. विधानसभा अध्यक्षपदाची संधी भोर-वेल्हा-मुळशीला मिळत होती. परंतु, येथील नेतृत्वाने ते होऊ दिले नाही. त्यामुळे तेथील जनता पुढील निवडणुकीत गप्प बसणार नाही. भावी पंतप्रधान म्हणवणार्‍यांचा पक्ष चार जिल्ह्यांपलिकडे गेलेला नाही. सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला, असे बोलले जाते. प्रत्यक्षात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. ते आता आम्ही सहन करणार नाही.

हर्षवर्धन पाटील यांनी अधिकार्‍यांचा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल, असे सांगितले. ते म्हणाले की, सरकार बदलले, तरी पुणे जिल्ह्यात अधिकार्‍यांना तसे वाटत नाही. गेल्या अडीच वर्षांत भाजप कार्यकर्त्याने साधा अर्ज दिला, तरी तो फेकून दिला जायचा. आता विरोधी पक्षातील लोक रात्री-अपरात्री भाजप नेत्यांना भेटत आहेत. मी तुमचाच असल्याचे सांगत आहेत. आमची कामे करा, अशी गळ घालत आहेत. परंतु, आता आरपारची लढाई करायची असेल, तर आपल्याला फाटी आखूनच काम करावे लागेल. बर्‍याच तालुक्यात बुथ कमिट्या सक्षम नाहीत. मतदानाच्या दोन दिवस आधी कार्यकर्ते कमी पडतात. अनेक बुथवर आपले लोक नसतात. त्याचा गैरफायदा घेतला जातो. येत्या निवडणुकीत यासंबंधी सूक्ष्म नियोजन करावे लागेल. डबल इंजिन सरकार असल्यामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. पण, जनतेपर्यंत योजना पोहचविण्यात कार्यकर्ता कमी पडता कामा नये. शिवाय अधिकार्‍यांसंबंधी निर्णय घ्यावा लागेल.

आमदार पडळकर यांनी बारामतीत पोलिस ठाण्यात येथील नेत्यांचे फोटो का लावले जात आहेत? असा सवाल केला. अधिकारी अजूनही त्यांच्या हुकमावर कारभार करीत भाजपला त्रास देत आहेत. अशा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली. विशेषत: पोलिस व महसूल खात्यातील अधिकारी त्यांच्या हातातील बाहुले झाल्याचे पडळकर म्हणाले.

भीमराव तापकीर यांनी सांगितले की, खडकवासल्यात विद्यमान खासदारांनी अधिक लक्ष घातले आहे. मागील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांना आम्ही 65 हजारांचे मताधिक्य दिले. त्यामुळे खासदार सातत्याने खडकवासल्याचे दौरे करीत आहेत. त्यातही आता आम्ही भाजपचे संघटन अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे गत निवडणुकीपेक्षा अधिकचे मताधिक्य आम्ही खडकवासल्यातून नक्की देऊ, अशी ग्वाही दिली.

आमदार राहुल कुल यांनी मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा सुधाराव्या लागतील, असे सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढली आहे. केंद्राच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्या जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवाव्या लागतील. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. तसेच नेत्यांनीही सर्वसामान्यांचे फोन उचलले पाहिजेत. त्यांची कामे मार्गी लावली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Back to top button