पोस्टाच्या फ्रँचायजी योजनेस अल्प प्रतिसाद | पुढारी

पोस्टाच्या फ्रँचायजी योजनेस अल्प प्रतिसाद

नंदकुमार सातुर्डेकर :

पिंपरी : पोस्ट खात्यातील विविध गुंतवणूक योजनेत आपण पैसे गुंतवून चांगला लाभ मिळवू शकतो. त्याबरोबर पोस्टाने सेवाभाव व मार्केटिंगची आवड असणार्‍यांसाठी फ्रँचायजी देऊ केली आहे, पण पोस्टाच्या फ्रँचायजी योजनेस पिंपरी-चिंचवडमध्ये अल्प प्रतिसाद लाभला आहे. शहरात केवळ चार जणांनी पोस्टाची फ्रँचायजी घेतली आहे. संगणक अन् मोबाईलच्या जमान्यात आजही पोस्ट खात्याने आपले महत्त्व कायम ठेवले आहे. देशात 3 लाखांहून अधिक पोस्ट कार्यालये आहेत.

त्यात पिंपरी- चिंचवडमधील 33 पोस्ट कार्यालयांचा समावेश आहे. टपाल खात्याने आता कात टाकली आहे. टपाल कार्यालये केवळ पत्रे किंवा पार्सल अशी दळणवळण सेवाच देत नाहीत, तर बचत योजना आणि विमा इत्यादी आर्थिक सेवाही पुरवतात. पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेची स्थापना झाल्याने व या बँकेमार्फत एटीएमसारख्या सुविधा दिल्या जात असल्याने ग्राहकांची सोय झाली आहे . ‘टाटा’शी करार करून राबवण्यात येत असलेली 399 रुपयांत 10 लाखांचा अपघात विमा योजना तर खूपच लोकप्रिय झाली आहे. पण आता तुम्ही पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवून नफा कमवू शकता, परंतु तुमच्या क्षेत्रात पोस्ट कार्यालयाची फ्रँचायजी घेऊन ग्राहकांना सेवा देऊ शकता.

भारतीय टपाल खात्याने फ्रँचायजी मॉडेलअंतर्गत टपाल कार्यालय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही भारतीय पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो. फ्रँचायजी घेऊन पोस्टाचे तिकीट, स्पीड पोस्ट, रजिस्ट्री, मनिऑर्डर आदी सेवा देऊन संबंधितांना उत्पन्न मिळवता येईल. फ्रँचायजी मॉडेलवर पोस्ट कार्यालय सुरू केल्यानंतर 6 महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जाईल. तुमची कामगिरी चांगली असल्यास तुम्हाला पुढील सेवा देण्याची परवानगी दिली जाईल.

पोस्ट कार्यालयापासून 4 कि. मी. अंतरावर अन् शॉपअक्ट परवाना असलेल्या व्यक्तीला फ्रँचायजी दिली जाते; परंतु पिंपरी चिंचवडमध्ये पोस्ट कार्यालयाचा बर्‍यापैकी विस्तार झाला आहे. इथे 33 पोस्ट कार्यालये आहेत. ग्राहक थेट पोस्ट कार्यालयात येऊन सेवा घेणे पसंत करतात. त्यामुळे शहरात या संकल्पनेस कमी प्रतिसाद मिळाला आहे. सध्या फक्त चार जणांनी फ्रँचायजी घेतली आहे.
                                           – के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, पोस्ट खाते

दोन प्रकारच्या फ्रँचायजी घेण्याची संधी
दोन प्रकारच्या फ्रँचायजी घेता येतात. पहिला पर्याय म्हणजे फ्रँचायजी आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टल एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल सेवेची मागणी आहे, पण तेथे पोस्ट कार्यालय सुरू करणे शक्य नाही, अशा ठिकाणी फ्रँचायजी च्या माध्यमातून आउटलेट्स सुरू करता येतील. त्याचबरोबर टपाल एजंट ग्रामीण आणि शहरी तिकिटे आणि स्टेशनरी विकून लाभ घेता येतो.

पोस्ट कार्यालय कुठे सुरू करता येईल ?
शहरात सध्या ज्या ठिकाणी पोस्ट कार्यालय नाही, अशा ठिकाणीच तुम्ही फ्रँचायजी मॉडेलवर पोस्ट कार्यालय सुरू करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी पोस्ट कार्यालय सुरू करू इच्छिता, ते ठिकाण पोस्ट कार्यालयापासून किमान 4 किलोमीटर लांब हवे.

दोन प्रकारच्या फ्रँचायजी घेण्याची संधी
दोन प्रकारच्या फ्रँचायजी घेता येतात. पहिला पर्याय म्हणजे फ्रँचायजी आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टल एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल सेवेची मागणी आहे, पण तेथे पोस्ट कार्यालय सुरू करणे शक्य नाही, अशा ठिकाणी फ्रँचायजीच्या माध्यमातून आउटलेट्स सुरू करता येतील. त्याचबरोबर टपाल एजंट ग्रामीण आणि शहरी तिकिटे आणि स्टेशनरी विकून लाभ घेता येतो.

Back to top button