विसर्जन हौदांमध्ये पाणीच नाही; खडकी परिसरातील चित्र; भाविकांकडून संताप व्यक्त | पुढारी

विसर्जन हौदांमध्ये पाणीच नाही; खडकी परिसरातील चित्र; भाविकांकडून संताप व्यक्त

खडकी; पुढारी वृत्तसेवा: खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये गौराई, गणपतींच्या विसर्जनासाठी महादेव घाटावर (दत्त घाट) बांधण्यात आलेल्या विसर्जन हौदांमध्ये पाणीच नसल्याने भक्तांची घोर निराशा झाली. प्रशासनाने या हौदांत तातडीने पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी केवळ एक दिवसाचा अवधी उरला आहे. विसर्जनासाठी पोलिस आणि बोर्ड प्रशासनाने कंबर कसली आहे. विसर्जन शांततेत आणि निर्विघनपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

महादेव घाट (दत्त घाट) आणि साप्रसमधील ज्ञानेश्वर घाटावर साफसफाई करण्यात आली असून, सर्वत्र विजेची सोय करण्यात आली आहे. घाटावर रंगरंगोटी करण्यात आली असून, निर्माल्या ठेवण्यासाठी मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहे. घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी हौद बांधण्यात आले. घरगुती गणपतीसाठी प्रशासनाच्या वतीने फिरते हौद तयार केले आहेत.

एकूण सहा वाहनांतून फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, गौराई व गणेशमूर्ती विसर्जनासाठी महादेव घाटावर बांधण्यात आलेल्या हौदांमध्ये पाणी नसल्याचे भक्तांनी सांगितले. हौदामध्ये पाणी नसल्याने अनेक गणेशभक्तांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, फिरते हौद तसेच घाटावर बांधण्यात आलेल्या हौदांमध्ये भक्तांनी विसर्जन केलेल्या मूर्ती विधिवतरीतीने पुणे महापालिकांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी 6 फिरते हौद तयार करण्यात आले आहेत. गणेश विसर्जन घाटावर हौद बांधण्यात आले असून, विसर्जन घाटाच्या हौदामध्ये दहाव्या दिवशी पाणी सोडण्यात येणार आहे.
                                                                       – शिरीष पत्की,
                                                                       आरोग्य अधीक्षक

Back to top button