पारगाव; पुढारी वृत्तसेवा: वळती येथील शिंदे मळ्यात बुधवारी (दि. ७) रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे नरहरी श्रीपती शिंदे या शेतकऱ्याच्या कांदा बराकीत पावसाचे पाणी शिरल्याने अंदाजे १०० पिशव्या कांदा वाहून गेला आहे. अगोदरच कांदा पिकाला बाजारभाव मिळत नाही. त्यातच आता या अस्मानी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणित मोठी भर पडली आहे.
वळती गावाच्या पूर्वेला शिंदे मळा आहे. तेथे नरहरी श्रीपती शिंदे हे शेतकरी राहतात. त्यांच्या घरामागे ओढ्याच्या पात्रावर सिमेंट बंधारा आहे. बुधवारी (दि. ७) रात्री या परिसरात मुसळधार पाऊस पडला.
मुसळधार पावसामुळे सिमेंट बंधाऱ्यातील पाणी ओव्हर फ्लो झाले. ओढ्याच्या पात्राच्या कडेला असलेल्या कांदा बराकीत पाण्याचा लोट शिरला. बराकीत अंदाजे ४५० ते ५०० पिशव्या कांदा साठवून ठेवला होता. पाण्याचा लोट मोठा असल्याने बराकीतील कांदे वाहून खाली रस्त्यावर आले. अंदाजे १०० ते १५० पिशव्या कांदा वाहून गेला आहे. नरहरी शिंदे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. बाजारभावात वाढ होईल अशा आशेने नरहरी शिंदे यांनी कांदा बराकीत साठवून ठेवला होता. परंतू पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा वाहून गेल्याने शिंदे यांचे नुकसान झाले आहे .
सुल्तानी, अस्मानी संकटामुळे कांदा उत्पादक संकटात
यंदा सुरुवातीपासूनच कांद्याला बाजारभावाची साथ मिळाली नाही. सततच्या पावसामुळे कांदा बराकीतील साठवलेला कांदा सडला. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी बाजारभावात कांदा विकावा लागला. त्यातच आता मुसळधार पावसाने अक्षरक्षः धुमाकूळ सुरू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणित सापडला आहे.