पुणे : कुत्र्यांचा एका महिन्यात 2 हजार जणांना चावा | पुढारी

पुणे : कुत्र्यांचा एका महिन्यात 2 हजार जणांना चावा

पुणे : जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्यावेळी किंवा मनुष्यवस्ती कमी असलेल्या भागात दरवर्षी या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी होत आहेत. ऑगस्ट महिन्यात 1 हजार 914 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. ग्रामीण भागात गावाच्या मुख्य ठिकाणासह काही अंतरावर वाड्या-वस्त्या असतात.

शेतकर्‍यांचा मित्र आणि घराची राखण करणारा मित्र म्हणजे कुत्रा (श्वान) असतो. परंतू, गावामध्ये पाळीव कुर्त्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असते आणि हे सर्व श्वान गावातील रस्त्यांवर दबा धरून बसलेले असतात. गाव किंवा वाड्या-वस्त्यांवर जाताना अनोळखी व्यक्तीच्या मनात एकच भिती असते, ती म्हणजे कुत्र्यांची. कोण, कधी, कोठून कसे येतील आणि हल्ला करतील याची शाश्वती नसते. त्यामुळे गावात प्रवेश करताना दबकतच प्रवेश करावा लागतो.

या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जुन्नर तालुक्यात 273 व्यक्ती कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडले असून, त्यापाठोपाठ दौंड येथे 198, इंदापूर येथे 133 आणि मावळ येथे 152 व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर आंबेगाव 77, बारामती 279, भोर 68, हवेली 225, खेड 146, मुळशी 108, पुरंदर 52, शिरूर 187 आणि वेल्हे 6 जणांना कुत्र्यांनी महिनाभरात चावा घेतला आहे.

 

Back to top button