पुणे महापालिकेची तयारी पूर्ण; विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार | पुढारी

पुणे महापालिकेची तयारी पूर्ण; विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करणार आहेत. त्यानंतर 10 वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

मिरवणुकांच्या मार्गावर स्वच्छतेसाठी औषधफवारणी केली जाणार आहे. निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमन कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. टिळक चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, नारायणपेठ माती गणपती जवळ मंडप टाकण्यात येणार आहेत.

आपत्कालीन संपर्क आणि दूरध्वनी :
020-25501269
020-25506800/1/3

आरोग्य विभागाची तयारी
आरोग्य विभागाच्या वतीने डेक्कन जिमखा आणि नूतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता याठिकाणी विसर्जन संपेपर्यंत वैद्यकीय उपचाराकरिता वैद्यकीय पथक 24 तास असेल. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, वाहनचालकाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रत्येक प्रभागात विसर्जनाची व्यवस्था
महापालिकेने गणपती विसर्जनाची तयारी पुर्ण केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात विसर्जन हौदाबरोबरच फिरते हौदसुद्धा असणार आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 303 ठिकाणी ही व्यवस्था असणार आहे.

‘गुलाल उधळणे टाळा’
विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल उधळणे टाळून तो फक्त
कपाळावर लावावा. गुलाल तोंडावर फेकू नये.
मूर्ती संकलन आणि दान केंद्राची व्यवस्था
गेल्या काही वर्षांपासून महापालिका मूर्ती दान आणि संकलनाचा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 216 ठिकाणी मूर्ती दान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Back to top button