पुणे शहरात संततधार; आठवडाभर मुक्काम; गणेश विसर्जन पावसात होणार | पुढारी

पुणे शहरात संततधार; आठवडाभर मुक्काम; गणेश विसर्जन पावसात होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी दुपारपासून पावसाने धुमशान सुरू ठेवले असून, पुढील आठ ते दहा दिवस संततधार पाऊस राहणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी जोरदार पाऊस पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाऊस जोरदार पडणार असल्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दुपारनंतर पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. अधूनमधून थोडीसी उघडीप दिल्यानंतर लागलीच पुन्हा जोरदार पाऊस बरसत आहे. संततधार पाऊस पडत असल्यामुळे पुणेकर नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहिलेच, काही भागांत पाणी साठले. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविणे नागरिकांना अवघड झाले होते.
संततधार पावसामुळे शहराच्या सर्वच भागांत वाहतूक मंदावली. दरम्यान, पुढील आठवडाभर शहरात संततधार पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

शहरात सायंकाळी सात वाजेपर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये
शिवाजीनगर 33.6
पाषाण 18.8
लोहगाव 21.2
चिंचवड 2
मगरपट्टा 33
कात्रज 4.6
सिंहगड रोड 1.6
लोणी काळभोर 0.8

Back to top button