पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलिस | पुढारी

पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलिस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस सज्ज झाले असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात केला जाणार आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, शीघ— कृतीदले, गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच बॉम्बशोधक व नाशक पथके दक्ष असणार आहेत. पोलिस प्रशिक्षण केंद्राबरोबरच इतर जिल्ह्यांमधूनदेखील अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची कडेकोट आखणी करण्यात आली आहे.

विशेषतः प्रमुख विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांचा खडा पहारा असणार असून, सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वॉच राहणार आहे. अनेक ठिकाणी टॉवर उभे केले आहेत. निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्यामुळे गर्दीचे प्रमाण अधिक आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवारी (दि.9) सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. यासाठीे मध्यवर्ती भागात काही रस्ते बंद असणार आहेत. वाहतूक विभागाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड, शिवाजी रस्त्यांवर बंदोबस्त असणार आहे. बुधवारी (दि.7) दुपारपासून शनिवारपर्यंत (दि.10) हा बंदोबस्त राहणार आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी वरिष्ठ अधिकारी, कर्मचार्‍यांसह सुमारे साडेआठ हजार जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एसआरपीएफ, होमगार्ड, शीघ— कृतीदले यांचादेखील समावेश आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात खास पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.- आर. राजा, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा.

…वॉच टॉवर
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वॉच टॉवरदेखील उभारण्यात येणार असून, चेन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास केले जातात. परराज्यातील चोरटेदेखील या कालावधीत पुण्यात दाखल होतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. त्यासाठी खास संपूर्ण गुन्हे शाखा कामाला लावली आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडून लक्ष ठेवले जाते आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथके तैनात करण्यात आली आहेत.

पाहा असा असेल बंदोबस्त
पोलिस उपायुक्त 10
सहायक पोलिस आयुक्त 23
पोलिस निरीक्षक 138
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक 625
कर्मचारी 7,742

Back to top button