सिंहगड भागात बिबट्याची दहशत सुरूच; खडकवासलाच्या डीआयएटी संस्थेत कुत्र्यांशी झुंज | पुढारी

सिंहगड भागात बिबट्याची दहशत सुरूच; खडकवासलाच्या डीआयएटी संस्थेत कुत्र्यांशी झुंज

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड भागात बिबट्याची दहशत सुरूच असून, खडकवासलाजवळील भारतीय लष्कराच्या डीआयएटी संस्थेत मंगळवारी (दि. 6) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका बिबट्याशी दोन कुत्र्यांनी झुंज दिली. बिबट्याच्या तावडीतून सुटका होऊन कुत्र्यांचे सुदैवाने प्राण वाचले. दरम्यान, भांबुर्डा (पुणे) वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. बिबट्या व कुत्र्यांचे हे थरार नाट्य डीआयएटी संस्थेच्या एका कर्मचार्‍याने आपल्या घरातून मोबाईल फोनमध्ये चित्रित केले आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक कुत्र्यांचा जोरदार आवाज ऐकून संस्थेच्या वरिष्ठ अधिकारी निवास रस्त्यालगत असलेल्या घरातील एका कर्मचार्‍याने घराच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहिले. त्या वेळी एक बिबट्या तेथील मोठ्या झाडावरून खाली उतरत असल्याचे दिसले. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या दोन कुर्त्यांवर बिबट्याने दोन ते तीनवेळा हल्ला केला. बिबट्याने एका कुत्र्याला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याशी झुंज देत कुत्र्याने सुटका केली. दहा ते बारा मिनिटे कुत्र्यांचा बिबट्या पाठलाग करीत होता. मात्र, बिबट्याच्या तावडीतून सुटका करून कुत्र्यांनी तेथून पलायन केले. या थरार नाट्यात कुत्री जोरजोरात बिबट्यावर भुंकत होती.

रहिवाशांना सावधानतेचा इशारा
वन विभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडावळे व वन कर्मचार्‍यांनी डीआयएटी संस्थेतील व लगतच्या परिसरातील जंगलाची पाहणी केली. सततच्या पावसामुळे या परिसरात झाडी, गवत, झुडपे वाढली आहेत. स्थानिक रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिंहगडाच्या डोंगररांगांशेजारी डीआयएटी संस्था आहे. परिसरात घनदाट जंगल आहे. त्यामुळे खाद्यासाठी बिबट्याने कुर्त्यांवर हल्ला केला. झाडावर तसेच परिसरात बिबट्याचे ठसे उमटले आहेत. बिबट्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
– प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे विभाग

Back to top button