भाजपचे बारामती लोकसभेचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे प्रत्त्युत्तर  | पुढारी

भाजपचे बारामती लोकसभेचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे प्रत्त्युत्तर 

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा २०२४ ला आहे. ती तरी निवडणूक वेळेत घ्या. नाहीतर आत्मविश्वास राहत नाही म्हणून त्याही निवडणूका पुढे ढकलू नका, असा टोला लगावत इतर निवडणुका तुम्हाला जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्यानेचं तुम्ही लांबवल्या आहेत, हे सामान्यातील सामान्य लोकांनादेखील समजत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अगोदर घ्या. त्यात काय जनता कौल देतीय ते बघा. नंतर लोकसभेची चर्चा करा, असे खडे बोल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सुनावले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील निकालचं त्यांना उत्तर देईल. तुमचे हे बारामती लोकसभा मतदार संघाचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, अशा शब्दात गारटकर यांनी भाजपाच्या मिशन लोकसभेला प्रत्युत्तर दिले. बुधवारी (दि. ७) जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. बारामतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बदल घडवून दाखवू असं वक्तव्य केलं. मात्र या मतदारसंघातील लोकांना बदल घडावा असे वाटत नाही. लोकांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत बावनकुळेंना असे वाटून काय उपयोग? असा प्रतिसवाल  गारटकर यांनी केला आहे.

गारटकर म्हणाले की, मतदारसंघात आर्थिक सुबत्ता, भौगोलिक विकास या बरोबरचं कृषि, तंत्रज्ञान, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रात आमूलाग्र बदल खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. विरोधातील खासदार असुन देखिल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघापेक्षा अधिक विकास बारामती लोकसभा मतदार संघात केला आहे. वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्या गोरगरीबांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचल्या. साहित्याचे वाटप मोठ्या प्रमाणात केले. याचा अर्थ असा की, राष्ट्रवादी काँग्रेस एक केडर असून ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर आहे. या केडरमुळेचं असे मोठे असंख्य उपक्रम मतदारसंघात होत असतात.

देशाचे नेते शरद पवार यांची कन्या म्हणून राजकारणात प्रवेश, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भगिणी म्हणून पहिले पाच वर्षे सहकारी आणि आज स्वतःला सिध्द करुन संसदेत सर्व विषयांवर मत मांडणे, आक्रमक पद्धतीने बोलणे, संपूर्ण देशातील एकाही खासदाराचा लोकसंपर्क असू शकत नाही तेवढा संपर्क सुप्रिया सुळे यांचा मतदार संघात आहे. त्यामुळे बावनकुळेंची वाक्य ही हवेतचं विरळतीलं असे ते म्हणाले.

Back to top button