पुणे : लम्पी स्किनचा सात तालुक्यांत संसर्ग, 43 जनावरांना लागण; पशुपालकांनी घाबरू नये | पुढारी

पुणे : लम्पी स्किनचा सात तालुक्यांत संसर्ग, 43 जनावरांना लागण; पशुपालकांनी घाबरू नये

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लम्पी स्किनची शेतकर्‍यांना चांगलीच धास्ती बसली आहे. काही ठिकाणी भीतीचे वातावरण असल्याने नागरिकांचे प्रशासनाकडून समाधान करण्यात येत आहे. तसेच उपाययोजना म्हणून लसीकरणाचा वेगदेखील वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात सात तालुक्यांत लम्पी स्किनची 43 जनावरांना लागण झाली असून, तीन जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली. प्रत्येक गावामध्ये प्राथमिक उपाययोजना सुरू असून, त्याचबरोबर पशुपालकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता लम्पी स्किनची लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. विधाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील इंदापूरमधील एक, दौंड तालुक्यातील दोन, शिरूरमधील दोन, मावळ एक, खेड एक, आंबेगाव एक आणि जुन्नर तालुक्यातील तीन अशा सात तालुक्यांतील अकरा गावांमध्ये लम्पीचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये 43 जनावरे बाधित झाली असून, तीन जनावरांचा मृत्यू तर 29 जनावरे ही उपचारानंतर बरी झाली आहेत.

आत्तापर्यंत 14 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी स्किनची लक्षणे आढळल्यानंतर पशुपालक पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधतात, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या फिरत्या पशुचिकित्सलायामार्फत नमुने गोळा करण्यात येत आहेत. जनावरांचे दूध उत्पादन घटते. या आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्राव होणे, भूक मंदावणे ही सुरवातीची लक्षणे दिसतात. या रोगाची बाधा गाय व म्हैसवर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते.

लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होतात. त्याचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास, चावणार्‍या माश्या, गोचीड आदींमार्फत होतो. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो, असेही डॉ. विधाटे यांनी सांगितले.

वेळेत उपचार होणे आवश्यक
जिल्ह्यात तीन जनावरांचा लम्पी स्किनमुळे मृत्यू झाला. ही जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना लम्पी झाल्याचे वेळेत लक्षात न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पशुपालकांना जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधल्यानंतर वेळेत उपचार सुरू करणे शक्य असल्याचे डॉ. विधाटे म्हणाले.

Back to top button