पिंपरी : बाप्पा पावला! सोने-चांदी, घर खरेदीमध्ये बूम, कोट्यवधींची उलाढाल | पुढारी

पिंपरी : बाप्पा पावला! सोने-चांदी, घर खरेदीमध्ये बूम, कोट्यवधींची उलाढाल

दीपेश सुराणा
पिंपरी : श्री गणेशाचे आगमन होऊन सात दिवसांचा कालावधी उलटला आहे. गणेशोत्सवामुळे शहरातील बाजारपेठेला चैतन्याचा स्पर्श लाभला आहे. सोने-चांदी खरेदी, घर खरेदी आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या खरेदी-विक्रीतून बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. बाजारातील ही उलाढाल पाहता व्यावसायिकांना ‘बाप्पा पावला’ असे म्हणावे लागेल.

सराफा बाजारात सध्या दररोज 15 ते 17 कोटी रुपयांची तर, इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीतून दररोज जवळपास 1 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. घर खरेदीसाठी 70 ते 75 टक्क्यांपर्यंत बुकिंग आहे. तर, वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्याने वाढ झाली आहे. गणेशोत्सव यंदा दिमाखदार पद्धतीने साजरा केला जात आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर परिणाम झाला होता. मात्र, यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे बाजारपेठेवरील मळभ सरले असून, खरेदीसाठी उत्साह पाहण्यास मिळत आहे.

सोन्याचे दागिने, गणरायासाठी चांदीचे पूजा साहित्य तसेच चांदीतील गणेशमूर्ती यांना चांगली मागणी आहे. घर खरेदीसाठी 70 ते 75 टक्क्यांपर्यंत बुकिंग होत आहे. नागरिकांकडून बजेट होमला प्राधान्य दिले जात आहे. वाहन विक्रीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 15 ते 20 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील उद्योग-व्यवसायात उत्साहाचे वातावरण आहे.

फूल बाजार तेजीत
गणेशोत्सवामुळे सध्या फूल बाजार तेजीत आहे. पिंपरी येथील घाऊक बाजारातून पिंपरी-चिंचवड, लोणावळा येथील फूल विक्रेते फुले घेऊन जातात. येथील फूल बाजारात 28 गाळे आहेत. गौरी विसर्जनापर्यंत येथील बाजारात दररोजची उलाढाल लाखो रुपयांपर्यंत झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सराफा बाजारात ‘बूम’
शहरातील सराफा बाजारात सोन्याचे दागिने, चांदीतील श्रीगणेशाची मूर्ती आणि पूजा साहित्याला चांगली मागणी आहे. सोन्यामध्ये टेंपल ज्वेलरी, अ‍ॅन्टीक ज्वेलरीला पसंती मिळत आहे. तर, चांदीमध्ये 10 ते 15 ग्रॅमपासून 2 ते 3 किलोपर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. शहराच्या सराफा बाजारात सध्या दररोज 15 ते 17 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवसायात 25 ते 30 टक्के इतकी वाढ आहे, अशी माहिती सराफ व्यावसायिक दिलीप सोनिगरा यांनी दिली.

रिअल इस्टेट क्षेत्रात 75 टक्के बुकिंग
गणेशोत्सवामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. सध्या 70 ते 75 टक्के बुकिंग वाढले आहे. नागरिकांकडून घरांची मागणी 70 ते 80 टक्क्याने वाढली आहे. त्यातही बजट होम्सला प्राधान्य मिळत आहे. मोशी, चिखली आदी पट्ट्यात घरे विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक किरण सावंत यांनी दिली.

वाहनक्षेत्रात 15 ते 20 टक्के वाढ
वाहनक्षेत्रात सध्या 300 ते 500 सीसी क्षमतेचे इंजिन असलेल्या मोटारसायकलची मागणी वाढली आहे. कोरोना काळानंतर दुचाकी वाहनांच्या बुकिंगमध्ये 15 ते 20 टक्क्याने वाढ झाली आहे. शहरामध्ये गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत अंदाजे साडेतीन ते चार
हजार मोटारसायकलची विक्री होऊ शकते. चारचाकी वाहनांनाही मागणी वाढली आहे. त्यातही इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत आहे, अशी माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल
इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या बाजारपेठेत फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मिक्सर, डीव्हीडी प्लेअर आदी इलेक्ट्रॉनिक साहित्याला चांगली मागणी आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या खरेदी-विक्रीची सध्या दररोज एक कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. एका मोठ्या दुकानाचीच सध्या 5 ते 10 लाखांपर्यंत दररोजची उलाढाल आहे. कोरोनाच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक साहित्याची घटलेल्या मागणीत सध्या 80 टक्क्याने वाढ झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

Back to top button