पुणे : ध्वनीक्षेपक परवानगीवरून मंडळांमध्ये नाराजीनाट्य; उपनगरांतील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत स्पीकर राहणार म्युट | पुढारी

पुणे : ध्वनीक्षेपक परवानगीवरून मंडळांमध्ये नाराजीनाट्य; उपनगरांतील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत स्पीकर राहणार म्युट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवादरम्यान यंदा चारऐवजी पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा (स्पीकर) वापर परवानगी देण्यात आली असली, तरी त्यासाठी जे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यावरून आता गणेश मंडळांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रामुख्याने उपनगरांत अनेक ठिकाणी 9 व्या दिवशी विसर्जन असते. मात्र, याच दिवशी म्हणजे दि. 8 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील गणेश मंडळांच्या बैठकीत यंदा गणेशोत्सवात सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास पाच दिवस परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी दि. 3 ते 7 सप्टेंबर आणि शुक्रवारी (9 सप्टेंबर) या कालावधीत एकूण 5 दिवस परवानगी देण्यासंबंधीचे आदेश काढले होते. मात्र, जे पाच दिवस निश्चित करण्यात आले आहेत, त्याऐवजी अखेरचे पाच दिवस परवानगी देण्यात यावी, अशी गणेश मंडळांची मागणी होती.

प्रामुख्याने उपनगरांतील अनेक ठिकाणी अखेरच्या आठव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन केले जाते. आता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. 7 सप्टेंबर म्हणजे 8 व्या दिवशी परवानगी असली, तरी नवव्या दिवशी परवानगी नाही. त्यामुळे उपनगरांतील गणेश मंडळांना रात्री बारा वाजण्याच्या आधीच मिरवणुकीचा डीजे बंद करावा लागणार आहे. तसेच, प्रामुख्याने मध्यवर्ती भागात रात्री देखावे पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांना रात्री बारानंतर देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार नाही. त्यामुळे 8 सप्टेंबरलाही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळांकडून करण्यात येत आहे.

गणेशोत्सवात प्रामुख्याने शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी होती. दि. 3 ऐवजी 7 सप्टेंबरला परवानगीची आवश्यकता असताना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे 9 व्या दिवशी परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गणेश मंडळांच्या वतीने करणार आहोत.

                                    – अजय भोसले, सह संपर्क प्रमुख शिवसेना (शिंदे गट)

Back to top button