राहू येथे ढगफुटीसदृश पाऊस | पुढारी

राहू येथे ढगफुटीसदृश पाऊस

राहू : पुढारी वृत्तसेवा: बेट परिसराच्या काही भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. मागील दोन दिवसांपासून परिसरात सतत पाऊस होत असून, मंगळवारी (दि. 6) पुन्हा सायंकाळी सात ते रात्री नऊच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. राहू ते वाळकी या दरम्यान असणार्‍या ओढ्यावरील पुलावर सुमारे सहा ते सात फूट पाणी असून येथील वाहतूक ठप्प झाली असल्याचे सचिन शिंदे यांनी कळविले, तर राहू येथील सहकारनगर परिसरामध्ये पावसामुळे एक पिकअप गाडी वाहून गेली असून, यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. यातील अद्यापही एक जण बेपत्ता झाला असल्याची माहिती तेथील रहिवासी अरुण नवले यांनी दिली.

मंगळवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. काही ठिकाणी पाच ते सहा वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाला. तो रात्री नऊ वाजेपर्यंत चालू होता. परिसरातील पिंपळगाव, खामगाव, राहू, सहकार नगर, टाकळी भीमा आदी गावांमध्येदेखील मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे राहू येथील सखल भागातील व्यापारीपेठेमध्ये सुमारे चार ते पाच फूट पाणी शिरले असून यामुळे अनेक विक्रेत्यांचे साहित्य भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सातत्याने होत असणार्‍या पावसामुळे तरकारी पिके पाण्यात बुडून गेली असून यामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे फ्लावर, गवार, कोबी, कोथिंबीर, मेथी यासारख्या पिकांना याचा फटका बसला आहे.

Back to top button