पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे विसर्जन होणार, बारामती लोकसभा एक लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकू : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ५५ हजारांच्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव झाला, परंतु २०२४ च्या निवडणुकीत येथून एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेत आम्ही जागा जिंकू. येथील पुढचा खासदार भाजपचा असेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीत सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे विसर्जन नक्की होईल, असेही ते म्हणाले.
बारामतीत बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. ६) पुणे जिल्हा ग्रामीण भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भीमराव तापकीर, गोपिचंद पडळकर, बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे, वासुदेव काळे, जालिंदर कामठे, बाळासाहेब गावडे, गणेश भेगडे, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके आदींची या वेळी उपस्थिती होती.
बावनकुळे म्हणाले, पवारांना राज्यात असली शिवसेना सोबत नको आहे. त्यांना नकली सेनेला बरोबर घेऊन राज्य करायचे होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एका मर्द मराठ्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होत बंड केले. भाजपने त्यांना साथ दिली. राज्यात आता सरकार असल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील. बारामती मतदारसंघ जिंकायचाच हा निर्धार मला कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे. इथे उपस्थित १४०० लोकांनी प्रत्येकी ५० कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला तर अशक्य असे काही नाही. दुसरीकडे पक्ष संघटन, बुथ कमिट्या मजबूत कराव्या लागतील. २०२४ ला राष्ट्रवादीचे विसर्जन निश्चित होईल. त्याशिवाय सर्वसामान्यांना पदे मिळणार नाहीत.
महाविकास आघाडी सरकारने मराठा, ओबीसी आरक्षण घालवले. नवीन सरकार आल्यानंतर पंधरा दिवसात ओबीसींना आरक्षण देण्यात आले. मराठा आरक्षणासंबंधी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही, चांगले वकील दिले नाहीत. त्यामुळे आरक्षणात झारीतील शुक्राचार्य कोण, हे जनतेला समजले आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ २०० दिवस हातात आहेत. ही निवडणूक ताकदीने लढायची आहे. येथे आठ-आठ वर्षे साखर कारखान्यांच्या निवडणुका होत नाहीत. अन्य सहकारी संस्था बोगस मतदारांच्या जिवावर ताब्यात घेतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या रस्त्यांवर स्वतःच्या पाट्या लावल्या जात आहेत. येथील रस्त्यांची उद्घाटने स्वतः गडकरी यांनी करावीत, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.या वेळी शिंदे, पाटील, पडळकर, तापकीर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन अविनाश मोटे यांनी केले.
सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर अर्धा मतदारसंघ जिंकलेला असेल
बारामती हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर आपण अर्धा मतदारसंघ जिंकलेला असेल, असे बावनकुळे म्हणाले.
विखे पाटलांकडे जबाबदारी
बारामती लोकसभा मतदारसंघाची राज्यातील मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील जबाबदारी सांभाळतील. संघटनात्मक पातळीवरील जबाबदारी आमदार राम शिंदे यांच्याकडे राहील. माझे नागपूरवर जेवढे लक्ष तेवढेच बारामतीवर यापुढे असेल. दर तीन महिन्यांनी मी बारामतीत येणार असल्याचे बावनकुळे यांनी या वेळी सांगितले. बारामतीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्रास देण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.