तळेगावला परीक्षा रद्द करण्याची नामुष्की, प्रश्नपत्रिका मिळत नसल्याची माहिती कळाली नसल्याने विद्यार्थी अडचणीत | पुढारी

तळेगावला परीक्षा रद्द करण्याची नामुष्की, प्रश्नपत्रिका मिळत नसल्याची माहिती कळाली नसल्याने विद्यार्थी अडचणीत

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये होणार्‍या लेखी परीक्षेच्या पेपरचा पुरवठा नगर परिषदेकडून न झाल्याने परीक्षा रद्द करावी लागली. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार सुमारे 13 दिवसांनी उघड झाल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अखत्यारित दोन माध्यमिक शाळा आहेत. या शाळेमधील विद्यार्थ्यांची परीक्षा 22 ऑगस्ट रोजी होणार होती; परंतु नगर परिषद शिक्षण समिती प्रशासन व शाळेतील कामकाज करणारे लिपिक यांच्यात सुसंवाद नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेळेमध्ये मिळाले नाही, त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याची वेळ माध्यमिक शाळेच्या शिक्षकांवर आली व विद्यार्थ्यांना या प्रकाराचा नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत पालकवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नगरपरिषदेच्या या 2 शाळांचे पेपर आता रद्द झाल्याने ते आता कधी घेण्यात येणार,त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना पुन्हा करावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण वाढला आहे, याबद्दल पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

…अन्यथा आंदोलन

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पेपर न मिळाल्याने परीक्षा रद्द झाली आहे, अशी माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांना समजताच त्यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये येऊन संबंधित प्रशासन, शिक्षण समितीमधील पदाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या, अन्यथा आम्हाला आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारादेखील दिला.

Back to top button