

पिंपरी : महिलेची पर्स हिसकावून पळून जाणार्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना चिंचवड येथे विठ्ठल मंदिराच्या बाजूला शनिवारी (दि. 3) रात्री पावणेआठ वाजता घडली. अक्षय परमेश्वर लवटे (22, रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुनील मधुकर अर्जून (25, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे पती रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, समोरून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील पर्स हिसकावली. मात्र, फिर्यादी यांनी दुसर्या हाताने पर्स घट्ट धरून ठेवली. त्या वेळी आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर मारले. फिर्यादी जखमी झाल्याने त्यांच्या हातातून पर्स निसटली. पर्समध्ये 5 हजार रुपयांचा मोबाईल, एक हजार रुपये रोख व एक हजार रुपयांची पर्स असा एकूण सात हजार रुपयांचा ऐवज होता. पर्स हिसकावून आरोपी दुचाकीवरून पळून जाऊ लागले. या वेळी काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी थांबली. त्यातील पाठीमागे बसलेला आरोपी अक्षय उतरून पळून जाऊ लागला. या वेळी फिर्यादी व त्यांच्या पतीने आरडा-ओरड केल्यानंतर तेथील नागरिकांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले. चिखली पोलिस तपास करीत आहेत.