पुणे : कमला नेहरू रुग्णालयावर हल्लाबोल | पुढारी

पुणे : कमला नेहरू रुग्णालयावर हल्लाबोल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची दयनीय अवस्था, उपचारांमध्ये होणारा हलगर्जीपणा आणि पायाभूत सुविधांची वानवा यावर नागरिकांनी हल्लाबोल केला आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या 27 वर्षीय तरुणाला वेळेत स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही या नागरिकांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे. ‘दोन आठवड्यांपूर्वी एका 27 वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला उपचारासाठी कमला नेहरू रुग्णालयात नेण्यात आले.

आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा दोन लिफ्टपैकी एक बंद होती आणि एक वरच्या मजल्यावर होती. आम्हाला स्ट्रेचरदेखील मिळाले नाही आणि मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. रुग्णाला प्राथमिक उपचार देण्यासाठी डॉक्टरही नव्हते. त्या परिस्थितीत तरुणाने अखेरचा श्वास घेतला,’ असा दावा लतेंद्र भिंगारे, किशोर भोसले, श्वेतांग निकाळजे यांनी केला आहे. हे 650 बेडचे हॉस्पिटल असूनही येथे अत्यावश्यक सेवेसाठी अतिदक्षता विभाग कार्यरत नाही.

अनेक मशिन कार्यरत नसल्यामुळे किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने सोनोग्राफी, एमआरआय स्कॅन आणि प्रयोगशाळेच्या चाचण्या बाहेरच कराव्या लागतात, असेही नमूद केले आहे. भीमनगर मंडळाने रुग्णालयात कर्मचार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या अयोग्य वागणुकीबाबत तसेच वैद्यकीय पायाभूत सुविधाबाबत आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याची तक्रार केली आहे. लतेंद्र भिंगारे म्हणाले की, रुग्णालयातील समस्या अनेकदा अधिकार्‍यांकडे मांडल्या गेल्या आहेत. बरेचदा रुग्णांना फक्त ससूनमध्ये पाठवले जाते.

स्पेअर पार्टची आवश्यकता
कमला रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूरज वाणी म्हणाले, ‘एमआरआय मशीन बंद आहे आणि कृष्णा डायग्नोस्टिक्सकडून सांगण्यात आले आहे की, मशिनसाठी स्पेअर पार्ट आवश्यक आहे. ते आयात करण्यासाठी थोडा वेळ लागेल. दरम्यान, रुग्णांना सुतार रुग्णालयात पाठवले जाणार असून त्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

Back to top button