अकोलेत खासगी सावकारांचा सुळसुळाट; सावकारशाही मोडीत काढण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र | पुढारी

अकोलेत खासगी सावकारांचा सुळसुळाट; सावकारशाही मोडीत काढण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र

अकोले; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यात दोन वर्षांपूर्वी सावकाराच्या जाचाला कंटाळून जामगाव (राजूर) व अकोले शहरातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. मात्र, तालुक्यात पुन्हा छुप्या सावकारकीने डोके वर काढल्याचे विदारक चित्र दिसत आहे. या सावकारांची मुजोरी मोडीत काढण्यात प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे, तर दुसरीकडे नेते मंडळी भाषणबाजीत गुंग असल्याने याप्रश्नी प्रशासनाला कामाला लावण्यास त्यांच्याकडे वेळच नाही.

आपल्या दैनंदिन जीवनात संसाराचा गाढा ओढताना, वाढत्या महागाईला तोंड देताना गरज सरेल म्हणून अक्षरशः धुणीभांडी, शेतमजुरी, कचरा वेचणार्‍या महिलांपासून अनेक शेतकरी, व्यापारी अन् काही लहान-मोठे उद्योजकही खासगी सावकारांकडून उसने पैसे घेतात. मात्र, त्यांच्या व्याजाचा टक्का इतका मोठा असतो की, कर्जदार त्यातच पुरते फसतात. शेवटी कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही, म्हणून अखेर काहीजण कर्जबाजारीपणाला व सावकाराच्या तगाद्यांना कंटाळून मृत्यूला कवटाळतात. काहींना सावकाराकडून जिवे मारण्याच्या धमकी आल्याच्या घटना अलिकडच्या काळात अकोले व राजूर परिसरात घडत आहेत.

राजूरमध्ये मटका किंग, तर काही सावकार राजरोसपणे पैशाच्या जोरावर राजकीय, सामाजिक क्षेत्रात ‘व्हॉईट कॉलर’ म्हणून धुमाकूळ घालत आहेत. अव्वाच्या- सव्वा व्याजाची वसुली करून कर्जदारांची पिळवणूक केली जाते. 5 टक्क्यांपासून चक्क 25 टक्क्यांपर्यंत हे सावकार व्याजाची आकारणी करतात. रक्कम वसुलीसाठी काही सावकारांकडून महिलांसह गुंडांचा वापर केला जातो.

खासगी सावकारांवर कारवाई करू, असे पोलिस यंत्रणा सांगत असली, तरी कायदा प्रभावी नसल्याने खासगी सावकारकी फोफावू लागली आहे. किरकोळ विक्रेत्याला सकाळी 500 रुपये व्यवसायाला दिले की, रात्री 600 रुपये गोळा करणारेही काही ‘रात्रीस खेळ चाले’ असे सावकार आहेत. भिशी, लिलाव भिशी आदी माध्यमातूनही खासगी सावकारकी फोफावली आहे.

खासगी सावकारकीची पद्धत..!
कोरे धनादेश घेणे, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे घेणे, वाहन, अन्य वस्तू ताब्यात घेऊन व्यावसायिक वापर करणे, सोन्याचे दागिने घेणे, कर्जदार व त्याच्या कुटुंबीयांना धमकावणे, महिलांना वसुलीसाठी पाठवणे, फायनान्स कंपन्या आणि खासगी भिशीच्या आडून सावकारी, कर्जाच्या बदल्यात शेतकर्‍यांच्या जमिनीची आपल्या नावे धनादेश, वेळप्रसंगी खरेदीखत होते.

अकोलेत बेबंदशाही..!
खासगी सावकारशाहीने अकोले तालुक्यात अक्षरशः बेबंदशाही निर्माण केल्याने लोक हैराण झाले आहेत. सहकार खात्याकडील अधिकृत माहितीनुसार तालुक्यात केवळ 8 परवानाधारक सावकार आहेत. परवानाप्राप्त सावकारी कर्जाचा व्याजदर दसादशे 12 टक्के असतो. मात्र, खासगी सावकारांकडून दरमहा दर शेकडा 5 ते 15 टक्क्यांपर्यंत म्हणजे दसादशे 60 ते 180 टक्के व्याजाने आकारणी करून पिळवणूक केली जाते.

Back to top button