पिंपरी : विसर्जन मिरवणुकीला खड्ड्यांचे विघ्न | पुढारी

पिंपरी : विसर्जन मिरवणुकीला खड्ड्यांचे विघ्न

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लहान व मोठ्या अशा सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यंदा या खड्डेमय रस्त्यांचे विघ्न पार करीत गणेशोत्सव मिरवणुका काढाव्या लागणार आहेत. तर, दुसरीकडे सर्वच खड्डे बुजविल्याचा दावा करीत महापालिका प्रशासन जबाबदारी झटकत आहे.

गणेश मंडळांची होणार कसरत
गणेशोत्सवाची सांगता येत्या शुक्रवारी (दि.9) होणार आहे. तसेच, शहरात सातव्या व नवव्या दिवशी अनेक गणेश मंडळ तसेच, हाऊसिंग सोसायट्यांच्या गणेशाचे विसर्जन होते. यापार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे अपेक्षित आहे. सर्व खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, शहरात अनेक ठिकाणी खड्डे कायम असल्याने चित्र आहे. त्यामुळे यंदा खड्ड्यांचे विघ्न पार करण्यासाठी गणेश मंडळांना कसरत करावी लागेल, असे चिन्हे आहे. प्रशासनाच्या निष्क्रीय व वेळकाढू भूमिकेमुळे मंडळांचे पदाधिकार्‍यांसह वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.

‘स्थापत्य’च्या कामाचा सुमार दर्जा
शहरात जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावताच पालिका प्रशासनाच्या बुरखा फाटला. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडल्याने स्थापत्य विभागाच्या कामाचा सुमार दर्जा उघड झाला. रस्ते कामांसाठी तसेच, दुरूस्तीकरीता कोट्यवधींचा खर्च करूनही पावसात रस्ते खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात चाक आदळून लहान-मोठे अपघात
झाले आहेत.

खड्डे बुजविल्याचा दावा
शहरात पावसामुळे तब्बल 3 हजार 443 खड्डे पडल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. त्यातील तब्बल 2 हजार 997 खड्डे डांबर, कोल्ड मिक्स, बीबीएस, डब्ल्यूएमएम, पेव्हिंग ब्लॉक, मुरूम, खड्डी, काँक्रीट टाकून भरल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. दुरूस्तीचे हे प्रमाण सुमारे 87 टक्के आहे.

ग्रेडसेपरेटर मार्गावरही खड्डे
दापोडी ते निगडी ग्रेडसेपरेटर या एक्स्प्रेस वे मार्गावरही यंदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वेगात जाणारी वाहने खड्ड्यात आदळतात. ते खड्डे बुजविल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला असला तरी, अनेक खड्डे कायम आहेत. पावसाच्या पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होत नसल्याने ग्रेडसेपरेटरमध्ये सातत्याने पाणी वाहत असते. त्यामुळे खड्डी व डांबर वेगळे होऊन मोठमोठे खड्डे निर्माण
होत आहेत.

खड्डे तातडीने बुजविण्यास प्राधान्य                                                                                                                             पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ते तातडीने दुरूस्त करून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे 90 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीपूर्वी सर्व खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

  • जनसंवाद सभेतील तक्रारींनंतर ‘स्थापत्य’कडून केवळ डागडुजी.
  • पेव्हिंग ब्लॉक टाकून डागडुजी केल्यास रस्ते अधिक धोकादायक.
  • पाऊस पडल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’.
  • ड्रेनेज, पाणीपुरवठा सेवावाहिन्यांचे काम झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी नाही.
  • महामेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावरील खड्ड्यांत भर.
  • सातत्याने पाणी वाहत असलेल्या रस्त्यांची मोठी दुरवस्था.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय रस्त्यांवरी खड्ड्यांची स्थिती
क्षेत्रीय कार्यालय खड्डे दुरुस्त केलेले टक्केवारी
अ 273 225 82
ब 259 243 94
क 784 623 79
ड 694 640 92
ई 345 322 93
फ 566 493 87
ग 343 298 87
फ 179 153 85
एकूण 3,443 2,997 87

Back to top button