बारामतीचा गड उद्धवस्त करणे अशक्य नाही : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

बारामतीचा गड उद्धवस्त करणे अशक्य नाही : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती हा पवारांचा गड मानला जातो. परंतु देशात असे अनेक गड उद्धवस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होते, संघर्ष निर्माण करण्याची ताकद येते, त्यावेळी चांगले-चांगले गड उद्धवस्त झाले आहेत. गड कोणा एकाच्या मालकीचा राहत नाही. कोणाचे वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार बदल होतो, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे बारामतीचा गड २०२४ ला भाजपने जिंकलेला दिसेल, असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे हे दोन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. ६ सप्टेंबरला सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपिचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती. बावनकुळे म्हणाले, देशात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची मोट बांधली जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो.

परंतु राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर आठ जागांच्या वर हा पक्ष गेलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु म्हणून ओळखले जातात. जगातील १५५ देशांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. २१ व्या शतकातील मजबूत भारत बनविण्याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. विरोधकांकडे फक्त राजकीय व्हिजन आहे. त्यातून त्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. परंतु मोदी हे देशासाठी काम करत आहेत. जो राष्ट्रासाठी काम करतो. त्यांच्या मागे जनता राहते.

बारामतीच्या दौऱ्याची सुरुवात पवारांच्या काटेवाडी गावापासून सुरु करत असल्याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, प्रत्येक बुथवर पदाधिकाऱ्याना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी काटेवाडीत जात आहे. दिवसभरात अनेकांना भेटणार असून जनतेची निवेदने स्विकारून ती सरकारकडे पाठवणार आहे. बारामतीत प्रत्येकाला यावंसं वाटत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सुळे काय म्हणाल्या हे मला माहिती नाही. परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामती दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात खासदार म्हणून सुळे त्यांना भेटू शकतात. बारामतीसह राज्यातील सर्व जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची संघटना वाढवणे, ताकद वाढविणे, उमेदवार निवडून आणणे ही पक्षाची जबाबदारी आहे. आमचा पक्ष जगातील व देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीची जागा जिंकायची हा आमचा निश्चय आहे. त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वारंवार प्रशंसा करत असताना बारामती टार्गेट का, या प्रश्नावर ते म्हणाले, एखाद्याने चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय. परंतु बारामती मतदारसंघात अजूनही ४५ टक्के जनता उपेक्षित आहे. ओबीसी, मराठा, धनगर समाजाचे प्रश्न कायम आहेत. चार-दोन लोक मोठे झाले म्हणजे समाज मोठा होत नाही. उपेक्षित एकत्र आल्यावर संघर्ष निर्माण होतो.आणि हा संघर्ष विजयापर्यंत घेवून जातो. ते काम आम्ही करू. देशातील अनेक गड उद्धवस्त झाले.

त्याचा निर्णय जनता घेत असते. डाॅ.अब्दुल कलाम यांचे व्हिजन पुढे घेवून जाण्याचे काम मोदी करत आहेत. देशाला सुरक्षित व मजबूत तेच करू शकतात, हे जनता जाणते. त्यामुळे असे अनेक किल्ले उद्धवस्त होतील. बारामती हा त्या दृष्टीने फार मोठा किल्ला नाही. मुंबई दौऱयावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बारामती मतदारसंघाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी गणेशाचे दर्श घेत राज्याची संघटनात्मक बैठक घेतली असल्याचे ते म्हणाले.

सीतारामण यांच्या दौऱयातही अनेकांचे प्रवेश
केंद्रीय अर्थमंत्री व आमच्या राष्ट्रीय नेत्या निर्मला सीतारामण या बारामती मतदारसंघाच्या प्रभारी आहेत. पुढील दीड वर्षात त्यांचे पाच ते सहा वेळा प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे होतील. केंद्र, राज्याच्या योजना त्या जनतेपर्यंत पोहोचवतील. केवळ घोषणाबाजी, चर्चा नव्हे तर पक्ष मजबूत करून आजवरची सर्वात मोठी लढाई आम्ही २०२४ ला लढू आणि जिंकू. जनमाणसांत आदर मिळाला नाही असे अनेक जण इतर पक्षांना कंटाळून आमच्याकडे येतील असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला.

देशात ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट
बारामतीत कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे घेतील. जेथे आपण कमजोर असतो. तेथे अगोदरपासून तयारी करावी लागते. बारामतीसह देशातील ४०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकू. बारामतीचा उमेदवार केंद्रीय नेतृत्व ठरवेल. परंतु आजवर झाली नाही अशी फाईट २०२४ मध्ये येथे पाहायला मिळेल असे बावनकुळे म्हणाले,

योजनांचे ऑडिट होणार
मागील अडीच वर्षात केंद्राच्या अनेक योजनांना राज्य शासनाने ब्रेक लावला. आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात केंद्र, राज्याकडून काय कामे अपेक्षित आहेत, यात लक्ष घालण्यात येईल. कल्याणकारी योजनांना ब्रेक लावला असेल तर त्याचे ऑडिट होईल. अर्थमंत्री सीतारामण या अधिकाऱ्यांच्याही बैठका घेतील. भरगच्च २१ कार्यक्रम त्या घेणार आहेत. मतदारसंघाचे विश्लेषण करून पुढील दौऱ्यात काय मदत केली पाहिजे, ती करतील. बारामतीसह राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघावर आम्ही पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभेला राज्यात २०० पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट शिंदे व फडणवीस यांनी ठेवले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Back to top button