पुणे : आता मिरवणुकीत चक्क फोल्डेबल रथ! मेट्रोच्या पुलामुळे मंडळांनी काढली शक्कल | पुढारी

पुणे : आता मिरवणुकीत चक्क फोल्डेबल रथ! मेट्रोच्या पुलामुळे मंडळांनी काढली शक्कल

शंकर कवडे
पुणे : शहराचा सांस्कृतिक वारसा आणि वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील मानाच्या मंडळांसह महत्त्वाच्या मंडळांनी यंदा फोल्डेबल रथ तयार केले आहेत. छत्रपती संभाजी पुलावरील मेट्रो गल्डरच्या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी रथ फोल्डेबल करण्यासह हायड्रोलिकचा वापर करत उंची कमी करण्याचीही शक्कल लढविली आहे.  गणेश विसर्जनादरम्यान लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता यामार्गे येणार्‍या मिरवणुका लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथून छत्रपती संभाजी पुलावरून (लकडी पूल) डेक्कनच्या दिशेने मार्गस्थ होतात.

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गादरम्यान असलेल्या छत्रपती संभाजी पुलावर मागील वर्षी महामेट्रोकडून गर्डर टाकण्यात आला. छत्रपती संभाजी पुलावर मेट्रोच्या गर्डर उभारल्यामुळे पूल व मेट्रोचा गर्डर यामधील अंतर 21 फूट असल्याने भव्य रथाची परंपरा असणार्‍या मंडळांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मेट्रोच्या कामामुळे विसर्जन मिरवणुकांवर मर्यादा येणार असल्याने गणेश मंडळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलिस व मंडळांमध्ये बैठकाही पार पडल्या. यावेळी, गणेश मंडळांनी छत्रपती संभाजी पुलावरून जाणार्‍या मेट्रोच्या मार्गावर आक्षेप घेतला. मार्गाची उंची कमी असल्याने विसर्जन मिरवणुकीत विसर्जन रथाला मेट्रोचा मार्ग अडथळा ठरेल असे म्हणणे मांडत काम थांबवण्याची मागणीही गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. यावेळी, पालिका तसेच मेट्रो प्रशासनाकडून विविध पद्धतींची चाचपणीही करण्यात आली होती.

मेट्रोच्या पुलाची उंची वाढविणे अथवा अन्य मार्गांचा अवलंब करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंडळांकडून नवीन शक्कल काढण्यात आली. त्यानुसार, मंडळांकडून भव्य रथाची परंपरा कायम ठेवत रथाची उंची गरजेनुसार फोल्डिंग तसेच हायड्रोलिक पद्धतीचा वापर करत कमी जास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रथांची परंपरा कायम राहणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्ट मार्फत 22 फुटी श्री स्वानंदेश रथ साकारण्यात येत आहे. हा रथ 18 फुटापर्यंत अखंड असणार आहे. त्यावरील 4 फुटांचा कळसाचा भाग हा फोल्डेबल असणार आहे. रथावर सहा छोटे शार्दुल, तीन कीर्तीमुख ज्यांची तोंडे तीन दिशांना असेल, चार सिंह विराल, खालच्या बाजूला चार मोठे शार्दुल ज्यांनी तो संबंध कळस डोक्यावर तोलला आहे, अशा संकल्पनेतून हा रथ साकारला आहे.

रथावर पाच कळस असणार आहेत. हा रथ दाक्षिणात्य शैलीतील असणार आहे. त्यासाठी, मार्बल फिनिशिंगच्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये, रंगीत प्रकाशव्यवस्था असून विविध रंगामध्ये हा रथ विसर्जन मिरवणुकीत सामील होणार आहे. रथाला जवळपास 40 हजार बल्बचा वापर करण्यात येणार आहे. याखेरीज, 25 ते 30 एलईडी फोकस व काही क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती शिल्पकार विवेक खटावकर यांनी दिली.

श्री तुळशीबाग गणपती मंडळ
मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग मंडळामार्फत श्री गजमुख रथ साकारण्यात येत आहे. या रथाची उंची 24 फुटांपर्यंत असणार आहे. तसेच, 18 फूट लांब व 16 फूट रुंद असणार आहे. हा रथ 18 फुटांपर्यंत अखंड राहणार आहे. उर्वरित 6 फूट फोल्डेबल असणार आहे. मेट्रोपिलर नजीक पोहोचताच फोल्डेबल असलेला भाग काढण्यात येईल. जेणेकरून मेट्रो पुलाखालून जाताना विसर्जन रथाला कोणताही अडथळा येणार नाही, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.

हुतात्मा बाबू गेनू मंडळ (ट्रस्ट)
मंडई येथील हुतात्मा बाबू गेनू मंडळामार्फत 24 फुटांचे काल्पनिक मंदिर असलेला रथ साकारण्यात येणार आहे. 19 फुटांपर्यंत हा रथ अखंड राहणार आहे. त्यापुढील 5 फूट फोल्डेबल राहणार आहे. मेट्रो पूल ते संभाजी पूल या दोघांमधील अंतर 21 फूट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळाचा रथ हा भव्य असणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाच्या वतीने अमोघ त्रिशक्ती नागरथ साकारण्यात येत आहे. 22 फूट लांब व 14 फूट रुंद असलेल्या या विसर्जन रथाची उंची 30 फूट असणार आहे. नागाच्या वेटोळ्यामध्ये शारदा-गजाननाची मूर्ती विराजमान होणार आहे. या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. हायड्रोलिकवर ब—म्हा, विष्णू व महेशाच्या त्रिमूर्ती साकारण्यात येणार आहे. शेषनाग हा 19 फुटांपर्यंत राहणार असून, त्यामागे हायड्रोलिकवर 11 फुटी त्रिमूर्ती असणार आहेत. छत्रपती संभाजी पुलावर रथ आल्यानंतर हायड्रोलिकवरील त्रिमूर्ती खाली घेतल्या जाणार आहेत. हायड्रोलिकमुळे 30 फुटांचा रथ 11 फुटांनी कमी होऊन 19 फूट होऊन रथ गल्डर खालून सहजरीत्या पार होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

Back to top button