पालिकेत काहींना नियम डावलून पदोन्नती; अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर | पुढारी

पालिकेत काहींना नियम डावलून पदोन्नती; अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही ठराविक अधिकार्‍यांची नियमबाह्यपणे पदोन्नती केली जात आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी वर्गात नाराजी आहे. या गैरमार्गाने दिल्या जाणार्‍या पदोन्नतीस आळा बसावा, असा सूर पालिका वर्तुळात आहे. नियमात बसत असताना तसेच, पदोन्नती समितीने शिफारस करूनही अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांची पदोन्नती रखडली आहे.

त्यासंदर्भात वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही अधिकारी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. मात्र, दुसरीकडे काही दोषी अधिकारी नियमात बसत नसतानाही आपले वजन वापरून आपल्या पदरात पदोन्नती पाडून घेत आहेत. पदाधिकार्‍यांना हाताशी धरून त्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव करून घेण्यात येतात. त्यासाठी राजकीय दबावाचा वापर करत आहेत. या प्रकारामुळे पालिका वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात भारतीय रिपब्लिकन मॉयनॉरिटीज फेडरेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह काही अधिकार्‍यांना नियमात बसत नसताना पदोन्नती देण्यात आली आहे.

आता, त्यांना उपायुक्त म्हणून पदोन्नतीचा घाट घालण्यात आला आहे. बोदडे यांच्याबाबत गैरव्यहाराच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतेही कारवाई झालेली नाही, असे असताना त्यांना पदोन्नती देऊन बक्षीस दिले जात असल्याचे खान यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

Back to top button