मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ भीषण अपघात; दोन जागीच ठार, अन्य जखमी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ भीषण अपघात; दोन जागीच ठार, अन्य जखमी
Published on
Updated on

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कारमधील एक महिला आणि पुरुष दोघांचा मृत्यू झाला असून, किरकोळ तसेच गंभीर जखमी झालेल्या इतर दहा जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने, नवी मुंबई येथे निघालेल्या मारुती इको मध्ये चालक आणि अन्य 15 जण बसले होते.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने  माडप बोगद्याजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभा असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की, कारमधील सर्वच प्रवाशांना इजा झाली. त्यातील महिला लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय -24) व  गणेश बाळू कोंढाळकर (वय -22, रा. कोंढावळे, ता. वाई) यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत त्यांची प्रकृती नाजूक आहे.

सोमवारी मध्यरात्री दोन वाजताचे सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. इको कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आय आर बी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी शिकस्त करावी लागली. अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते.

सदर अपघाताची भीषणता लक्षात घेत खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम (वय – 32) याने लेनची शिस्त न पाळता, भरधाव वेगाने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचे कारण प्राथमिक स्वरूपात पुढे आले आहे. पोलीस यंत्रणा याबाबत अधिक चौकशी करत असली तरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अति वेगाने कार चालवल्याने झालेल्या या भीषण अपघाताचे स्वरुप पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news