नव्या प्रणालीनुसारच 85 महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन; नॅक मूल्यांकन सोपे झाल्याचे प्राचार्यांचे मत | पुढारी

नव्या प्रणालीनुसारच 85 महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन; नॅक मूल्यांकन सोपे झाल्याचे प्राचार्यांचे मत

गणेश खळदकर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील 85 महाविद्यालयांचे मूल्यांकन आता नवीन प्रणालीनुसारच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन बैठक घेऊन त्यांना मूल्यांकनाचे महत्त्व आणि मूल्यांकन नेमके कसे करावे, नवीन प्रणाली कशी आहे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. यातून नॅक मूल्यांकन सोपे झाल्याचे मत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील बहुसंख्य महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत सहभाग घेऊन नॅककडून नॅक मान्यतेचा दर्जा प्राप्त करून घेतलेला आहे. परंतु, त्यातील काही महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची वैधता संपुष्टात आली आहे. अशा संलग्न महाविद्यालयांच्या व्यवस्थापन प्रतिनिधी तसेच प्राचार्य यांची ऑनलाइन कार्यशाळा घेऊन त्यांना मूल्यांकनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यासंदर्भात काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅक मूल्यांकनासाठी पात्र असलेल्या महाविद्यालयांचे नवीन प्रणालीनुसार मूल्यांकन करण्यासाठी नवीन मॅन्युअल तयार करण्यात आले आहे. त्यानुसारच मूल्यांकन करावे लागणार आहे. यापुढे महाविद्यालयांना आवश्यक कोणत्याही सुविधा तसेच विद्यापीठाकडून, यूजीसीकडून मिळणारे अर्थसाहाय्य हवे असेल तर नॅक बंधनकारक करण्यात आले आहे.

मूल्यांकनामधील जाचक अटी वगळल्या
नॅक मूल्यांकनामधील अनेक जाचक अटी काढण्यात आल्या आहेत. उदा. : महाविद्यालयात परदेशी विद्यार्थी किंवा परराज्यातील विद्यार्थी किती प्रवेश घेतात, यासाठी गुण होते. परंतु, ग्रामीण भागात या दोन्ही प्रकारांतील विद्यार्थी प्रवेश घेत नव्हते, त्यामुळे ही अट वगळण्यात आली आहे. तसेच, अपेक्षित प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली असून, मोजकेच प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याचबरोबर अशाच क्षेत्रांची माहिती विचारण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयाला गुण मिळवणे शक्य आहे.

नॅक मूल्यांकनाची नवीन प्रक्रिया सुकर आणि सुसह्य झाली आहे. मूल्यांकनामधील क्लिष्टता आता दूर झाली आहे. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांनी या प्रक्रियेत येऊन महाविद्यालयांचा दर्जा, गुणवत्ता सुधारणे अत्यंत गरजेचे आहे.
           

                                                       – डॉ. नंदकुमार जाधव, प्राचार्य,
                                      सुभाष बाबूराव कुल कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय

Back to top button