अकरावीच्या ऑनलाइन विशेष फेरीत 24 हजारांवर प्रवेश; 17 हजार 641 विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय | पुढारी

अकरावीच्या ऑनलाइन विशेष फेरीत 24 हजारांवर प्रवेश; 17 हजार 641 विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीत 24 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. तर, तब्बल 17 हजार 641 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 8 सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे.

महाविद्यालयांमध्ये 1 लाख 10 हजार 990 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 93 हजार 960 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या राबवण्यात आल्या. प्रवेशप्रक्रियेतील विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश सोमवारी (दि.5) जाहीर करण्यात आले. विशेष फेरीत 17 हजार 641 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे 3 हजार 210 विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे, तर 1 हजार 545 विद्यार्थ्यांना तिसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. एकूण 24 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला.

त्यात 2 हजार 181 विद्यार्थ्यांना कला शाखेत, 8 हजार 811 विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत, 12 हजार 956 विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत आणि 675 विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची प्रक्रिया 8 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी लागेल. पुढील फेरीची प्रवेशप्रक्रिया 9 सप्टेंबरनंतर सुरू करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी पाच हजारांवर प्रवेश
अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत पहिल्याच दिवशी 5 हजार 326 प्रवेश झाले. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा 50 हजारांचा टप्पादेखील पार झाला. आरक्षित प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गात रूपांतरित करून यादी जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वाधिक प्रवेश खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीत सर्वाधिक प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दृष्टिक्षेपात प्रवेशप्रक्रिया
एकूण महाविद्यालये : 315
एकूण प्रवेशक्षमता : 110990
एकूण नोंदणी : 105989
कोटा प्रवेशक्षमता : 17030
कोटांतर्गत प्रवेश : 8137
कॅप प्रवेशक्षमता : 93960
कॅप अंतर्गत अर्ज : 73361
एकूण प्रवेश : 50813
रिक्त जागा : 60177

आत्तापर्यंतच्या फेर्‍यांमधील प्रवेश
पहिली फेरी : 42 हजार 709
दुसरी फेरी : 17 हजार 62
तिसरी फेरी : 12 हजार 253
विशेष फेरी : 24 हजार 623

कटऑफही 85 टक्क्यांच्या पुढेच
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुण (कटऑफ) विशेष फेरीत 5 ते 7 टक्क्यांनी कमी झाले आहेत. परंतु, विज्ञान शाखेचा कटऑफ 85 टक्क्यांच्या पुढेच आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेत प्रवेश विद्यार्थ्यांना दुरापास्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात 86.4 टक्के कटऑफ आहे, तर फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत 92, तर खुल्या प्रवर्गासाठी विज्ञान शाखेचा कटऑफ 94.8 टक्के आहे. स. प. महाविद्यालयात कला शाखा 92 टक्के, वाणिज्य शाखा 87 टक्के, तर विज्ञान शाखेत 90.8 टक्के, नौरोसजी वाडिया महाविद्यालयात कला शाखा 80 टक्के आणि विज्ञान शाखेत 83.4 टक्के, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स 78.4 टक्के, सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी 94 टक्के, वाणिज्य शाखेसाठी 93 टक्के, श्यामराव कलमाडी महाविद्यालयात कला शाखा 89.6 टक्के, वाणिज्य शाखा 87.2 टक्के, तर विज्ञान शाखा 89 टक्के, जय हिंद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखा 84.4 टक्के, तर विज्ञान शाखा 92.4 टक्के, मॉडर्न महाविद्यालयात कला मराठी शाखेसाठी 65.4 टक्के, वाणिज्य शाखेसाठी 82 टक्के, तर विज्ञान शाखेसाठी 87.2 टक्के, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कला मराठी शाखेसाठी 85.2 टक्के, तर विज्ञान शाखेसाठी 85.8 टक्के गुण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकरावीच्या तीन्ही फेर्‍यांचा आढावा घेतला तर विशेष फेरीत कटऑफ गुण कमी होतील, अशी अपेक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. परंतु, विशेष फेरीत काही महाविद्यालयांचे कटऑफ कमी तर काही महाविद्यालयांचे कटऑफ वाढलेले दिसून आले. तसेच, विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल, तर 85 टक्क्यांच्या पुढेच गुण असणे गरजेचे असल्याचे दिसून आले.

Back to top button