अमित शहा मुंबईत हाच सेनेचा नैतिक विजय: विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन

अंबादास दानवे
अंबादास दानवे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या देशपातळीवरील नेत्याला मुंबईत येऊन महापालिका निवडणुकीविषयी भूमिका मांडावी लागते, येथेच शिवसेनेचा नैतिक विजय झाला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पुण्यातील गणेशोत्सवात मंडळांना भेट देण्यासाठी आलेल्या दानवे यांनी विधान परिषदेतील उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या घरी भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दानवे म्हणाले, 'शहा यांनी महापालिका निवडणुकीविषयी भूमिका मांडली. येथील भाजपच्या नेत्यांमध्ये ही शक्ती नाही का, गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करीष्मा होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. गेल्या वेळीपेक्षाही या वेळचा शिवसेनेचा विजय अधिक देदीप्यमान असेल. मुंबईतील व्यापारी केंद्रे, उद्योग केंद्रे मुंबईहून दिल्लीला नाही, तर अहमदाबादला नेत आहेत. त्याची चीड मुंबईत, महाराष्ट्रात आहे.' ते म्हणाले, 'शिवसेनेच्या लोकांना गद्दारी करावयाला कोणी भाग पाडले. शिवसेना आधीपासूनच जमिनीवर आहे, भाजप आकाशात आहे. शिवसेना त्यांना आकाश दाखवेल.'

मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना दानवे म्हणाले, की लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत त्यांनी कोणावर टीका केली होती. भोंग्याबाबत आता त्यांची भूमिका काय आहे. भाजपचे नेते मातोश्री येथे चर्चेला आले होते. त्यांना खरी कोणाची शिवसेना आहे, ते माहिती आहे. दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांचाच होईल. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे खरे ठाकरे आहेत. अन्य ठाकरे असतील किंवा नसतील. सध्या अनेक मंत्री शिवसेनेवर टीका करीत आहेत, या प्रश्नावर दानवे म्हणाले, की खोके आले आहेत. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यांची मस्तीची भाषा आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा आहे. येथे अशी भाषा चालत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news