98 बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा लागला शोध | पुढारी

98 बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा लागला शोध

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : वडगाव मावळ पोलिस स्टेशन व गंगामाता वाहन शोध संस्था यांनी संयुक्त पणे 98 वाहनांच्या मूळ मालकांना शोधून काढले असून संबंधित मालकांनी आपली ओळख पटवून वाहन घेऊन जावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे. पोलिस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यांमध्ये पोलिस जप्त करतात. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्यामुळे ही वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे मालकांच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत.

या पाश्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुढाकार घेत बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेत ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले आहे. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार वडगाव मावळ पोलिसांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

त्यासाठी पोलिसांनी परंदवडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनांची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने बेवारस वाहनांचे चासि व इंजिन क्रमांक यावरून वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावला.

एकूण 98 वाहनांपैकी 49 बेवारस वाहने आहेत, मूळ मालकांनी पत्र मिळताच 8 दिवसाच्या आत आपले वाहन घेवून जावे. अन्यथा त्या 549 वाहनांचा न्यायालयीन आदेशाने लिलाव करण्यात येईल, असेही पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले. मूळ मालकांचा शोध लावण्यासाठी पोलिस निरीक्षक विलास भोसले, पोलिस हवालदार मनोज कदम, श्रीशैल कंटोळी, संदीप वंडाळे, सिद्धान्त वाघमारे व संस्था अध्यक्ष राम उदावंत उपाअध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे यांनी परिश्रम घेतले.

Back to top button