शिरसगाव काटा येथील युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू | पुढारी

शिरसगाव काटा येथील युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा: उसाच्या ट्रेलरला धडकून शिरसगाव काटा (ता शिरूर) येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सखाराम विश्वनाथ सरके (वय २७, रा. शिरसगाव काटा) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील सखाराम विश्वनाथ सरके हा तरुण रविवारी (दि. ४) रात्री सातच्या दरम्यान न्हावरेकडून शिरसगावकडे दुचाकीवरून येत होता. निर्वी येथे आल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रेलरला जोरात धडकून अपघात झाला. या अपघातात सरके याला गंभीर दुखापत झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान सोमवारी (दि. ५) सकाळी सखारामवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सखाराम सरके हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तसेच स्वभावाने परिसरात परिचित होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.

दरम्यान उसाच्या ट्रेलरला धडकून अपघात होण्याची ही दोन महिन्यात तिसरी घटना असून यापूर्वी मांडवगण फराटा-गणपती माळ दरम्यान युवकाला अपघातात जीव गमवावा लागला आहे. तसेच वडगाव रासाई येथेही काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. अनेक उसाचे ट्रेलर हे धोकादायक पद्धतीने रस्त्यावर उसाचे ट्रेलर लावून जात असतात, तर तीन तीन ट्रॉली घेऊन ऊस वाहतूक करत असतात. यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी नगरिकांकडून करण्यात येते; मात्र संबंधित प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे.

Back to top button