उंडवडी : वाहून आलेली वाळू चोरीला जाण्याची भीती | पुढारी

उंडवडी : वाहून आलेली वाळू चोरीला जाण्याची भीती

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: शिर्सुफळ येथे सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. याचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असला, तरी ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली आहे. ही वाळू ग्रामपंचायत कार्यालयासमोरील बाजारतळातील पटांगणात वाहून आल्याने वाळू कोणाची?

या वाळूवर अधिकार ग्रामपंचायतीचा की महसूल विभागाचा? असे प्रश्न गावकर्‍यांना पडले आहेत. सध्या वाळूचे दर सोन्यापेक्षाही महाग झाले आहेत. वाळू मिळणेही कठीण झाले आहे. अशात मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आल्याने येथील नागरिकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत, तर ही वाळू चोरीला जाण्याची भीतीही येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

सध्या वाळूचे लिलाव बंद असल्याने वाळूउपसा बंद आहे. त्यामुळे ही वाळू सध्यातरी आहे तेथेच ठेवावी लागणार आहे.
                                                                    – अरुण त्रिभुवन, तलाठी

 

Back to top button