राहू; पुढारी वृत्तसेवा: विजेच्या कडकडाटासह राहू बेट परिसरामध्ये सलग दुसर्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मागील आठवड्यात देखील राहू बेट परिसरात जोरदार पाऊस झाला होता.
परिसरातील वाळकी, खामगाव पिंपळगाव, पानवली, देवकरवाडी, कोरेगाव दहिटणे, नांदूर या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जोरदार वार्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या. काही ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ऊसपिकासाठी हा पाऊस उपयुक्त असला, तरी तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले. मेथी, शेपू, कोथिंबीर आदी नगदी पिकांना पावसाचा फटका बसला.