भवानी पेठ : विकासाच्या नावाखाली उधळपट्टी; निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे गंज पेठेतील नागरिक संतप्त | पुढारी

भवानी पेठ : विकासाच्या नावाखाली उधळपट्टी; निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे गंज पेठेतील नागरिक संतप्त

भवानी पेठ; पुढारी वृत्तसेवा: गंज पेठेतील विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे ती पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मोडकळीस आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. विकासकांमाच्या नावाखाली महापालिका पैशांचा अपव्यय करत असून या कांमाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लहुजी वस्ताद तालिम मार्गावर चेंबरची कामे गेल्या काळात पूर्ण झाली. त्यानंतर महिन्याभरात चेंबर खचून गेले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून राहत आहे. तसेच अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्तेही उखडले आहेत. सांडपाणी वाहिनीची तोडफोड झाल्याने मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.अरुंद रस्त्यांवर मोठ्या व्यासाच्या वाहिन्या पडल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत आहे. तसेच विकासकामे करताना काढलेला राडारोडा परिसरात अस्ताव्यस्त पसरला आहे. या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे निकृष्ट दर्जाच्या विकासकामांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. यामुळे नागरिकांना विविघ समस्यांचा सामना करावा लागत आहे.
                                                                            -सचिन थोरात,
                                                                           स्थानिक नागरिक

Back to top button