थोरांदळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; 18 ग्रामपंचायतींच्या 144 जांगासाठी 252 अर्ज, सरपंचपदासाठी 87 अर्ज वैध | पुढारी

थोरांदळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; 18 ग्रामपंचायतींच्या 144 जांगासाठी 252 अर्ज, सरपंचपदासाठी 87 अर्ज वैध

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाच्या 18 जागांसाठी 87 व ग्रामपंचायत सदस्यपदाच्या 144 जागांसाठी 252 अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. तहसीलदार रमा जोशी यांनी ही माहिती दिली. मंगळवार (दि. 6) ही अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, थोरांदळे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. माळीण ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

ग्रामपंचायत थोरांदळेच्या सरपंचपदासाठी 1 व सदस्यांच्या 9 जागांसाठी 9 अर्ज दाखल झाल्याने येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. माळीण सरपंचपदाच्या 1 जागेसाठी 3 तर सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7 अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. दोन्ही ग्रामपंचायतीच्या निकालाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

आंबेगाव गावठाण सरपंचपदासाठी 8, गंगापूर बुद्रुक 3, पिंपळगाव तर्फे घोडा 4, राजपूर 5, राजेवाडी 2, पांचाळे बुद्रुक 4, शिनोली 5, आसाणे 3, कोंधवळ 7, ढाकाळे 3, पोखरी 5, जांभोरी 7, तिरपाड 8, फदालेवाडी-उगलेवाडी 8, वडगाव काशिंबेग 5 व वाळुंजवाडी 6 असे सरपंचपदाच्या 18 जागांसाठी 87 उमेदवार उभे आहेत.

सदस्यपदासाठी आंबेगाव गावठाण 7 जागांसाठी 26, गंगापूर बुद्रुक 9 जागांसाठी 18, पिंपळगाव तर्फे घोडा 9 जागांसाठी 24, राजपूर 7 जागांसाठी 10, राजेवाडी 7 जागांसाठी 10, पांचाळे बुद्रुक 7 जागांसाठी 8, शिनोली 11 जागांसाठी 28, आसाणे 7 जागांसाठी 9, कोंढवळ 9 जागांसाठी 22, ढाकाळे 7 जागांसाठी 8, पोखरी 7 जागांसाठी 5, जांभोरी 9 जागांसाठी 14, तिरपाड 9 जागांसाठी 12, फदालेवाडी – उगलेवाडी 7 जागांसाठी 9, वडगाव काशिंबेग 9 जागांसाठी 18, वाळुंजवाडी 7 जागांसाठी 15 असे 144 सदस्यपदासाठी 252 उमेदवार उभे आहेत.

6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबरला आंबेगाव तहसीलदार कार्यालय, घोडेगाव येथे होणार आहे.

Back to top button