नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : केंद्र शासनाच्या आदेशानंतर खासगी ट्रॅव्हल्स बसेसना जीपीएस यंत्रणा व ट्रॅकर बसविण्यात आल्याने प्रवास सुखकर व निर्धोक झाला आहे. प्रवासाला निघालेली बस कुठे आहे, ती कुठे, किती वेळ थांबली, किती वाजता पोहचली, याबाबतची माहिती मिळू शकत असल्याने वाहनमालक, प्रवासी व प्रवाशांचे नातेवाईक या सर्वांची उत्तम सोय झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून दर्यापूर, अमरावती, नागपूर, गोवा, बंगळूर, राजस्थान, हुबळी, बेळगाव, अहमदाबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी खासगी बसेस उपलब्ध आहेत. शहरातून विविध ठिकाणी सुमारे तीनशे खासगी बसेस धावत असून, यापैकी 80 ते 90 खासगी ट्रॅव्हल्स बसेसची पिंपरी-चिंचवड आरटीओकडे नोंदणी झाली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सने बुकिंग केल्यानंतर प्रवासाला निघालेल्या व्यक्तीला त्याच्या मोबाईल नंबरवर कृपया प्रवासाला निघताना आपल्या पुणे ते दर्यापूर (उदाहरण) वाहनाचे डिटेल्स पाहा अशा स्वरूपाचा संदेश येतो. त्यात बस नंबर व लिंक दिलेली असते. त्या लिंकवर गेल्यानंतर बस ट्रॅक होते .ती लिंक प्रवाशाने आपल्या इच्छितस्थळी जाणार असलेल्या नातेवाइकाला पाठविल्यानंतर तो नातेवाईक ती बस आता कुठे आहे, याबाबत माहिती घेऊ शकतो.
खासगी ट्रॅव्हल्स बसेसना जीपीएस यंत्रणा बसविणे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे. शहरात सुमारे 80 ते 90 खासगी ट्रॅव्हल्स बसेसची पिंपरी-चिंचवड आरटीओकडे नोंदणी झाली आहे. इतर बसेस ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या ठिकाणी त्यांची नोंदणी झाली आहे.
– मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीखासगी ट्रॅव्हल्स बसेसमध्ये बसविण्यात आलेली ट्रॅकर सिस्टिम बसमालक , प्रवासी सर्वांसाठी उपयुक्त आहे. गाडी किती वाजता निघाली, कुठे थांबली आहे का? किती वाजता पोहचणार आहे, हे समजते. या बसेसचे पिकअप वेगवेगळ्या ठिकाणाहून होते. पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी, काळेवाडी, लांडेवाडी, तर पुण्यात संगमवाडी असे प्रत्येक ठिकाणी प्रवासी थांबलेले असतात. त्यांना आता गाडी कुठे आहे ती साधारण आपल्या इथे किती वाजता येईल, याविषयी माहिती मिळू शकते. गाडी किती वाजता कुठे आहे, हे त्यांच्या नातेवाइकांना कळते.
– आप्पा काळभोर, ट्रॅव्हल, निगडी
जीपीएस म्हणजे काय?
जीपीएस म्हणजे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम. ही संपूर्ण जगातील दिशा दर्शवणारी सॅटेलाइट प्रणाली आहे. ही प्रणाली पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची माहिती आणि वेळ जीपीएस रीसिवरला देते. या प्रणालीचा वापर करून आपण पृथ्वीवरील कोणत्याही रस्त्यांवर फिरू शकतो. कोणतेही रस्ते, त्या रस्त्यांमधील अंतर या प्रणालीद्वारे समजू शकते.
जीपीएस काम कसे करते ?
जीपीएस हे 30 सॅटेलाइटचे एक नेटवर्क आहे. ते पृथ्वीच्या कक्षेत आजूबाजूला फिरत असते. जेव्हा आपण मोबाईलचे जीपीएस सुरू करतो, तेव्हा 4 सॅटेलाइट आपली लोकेशन चेक करतात आणि वेळोवेळी या चार सॅटेलाइटमुळे आपल्या लोकेशनची आणि वेळेची माहिती सिग्नलद्वारे ट्रान्समिट केली जाते. या ट्रान्समिट केल्या गेलेल्या सिग्नलची स्पीड ही लाइटच्या स्पीड इतकी असते. आपला मोबाईल या वेळी रीसिवरचे कार्य करतो. त्यामुळे आपल्याला योग्य लोकेशनची माहिती मिळते.