पिंपरी : नोटरी प्रतिज्ञापत्राद्वारे शेकडो मिळकतींच्या नोंदी | पुढारी

पिंपरी : नोटरी प्रतिज्ञापत्राद्वारे शेकडो मिळकतींच्या नोंदी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  केवळ नोटरी प्रतिज्ञापत्र आणि कुलमुखत्यार पत्राद्वारे नियमबाह्य पद्धतीने अनेक मिळकतींची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. तळवडे कर संकलन विभागीय कार्यालयात हा प्रकार घडला असून, त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आर्थिक लाभासाठी नोंदी
अधिकार्‍यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी तळवडे कार्यालयात शेकडो मिळकतींच्या नियमबाह्य नोंदी केल्या आहेत. अनेक मिळकतींची विभागणी केली आहे. तर, अनेक मिळकतींचे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यासाठी कुलमुखत्यार पत्र, नोटरी प्रतिज्ञापत्राचा वापर करण्यात आला आहे. तसेच, मिळकतींचे क्षेत्रफळही कमी नोंदविण्यात आले आहे. बिगरनिवासी मिळकत निवासी म्हणून नोंद केली गेली आहे. या प्रकारे शेकडो मिळकतींची नोंद करण्यात आली आहे. परिणामी, पालिकेचे मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी तक्रार भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केली आहे.

17 विभागीय कर संकलन कार्यालये
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे शहरात एकूण 17 विभागीय कर संकलन कार्यालये आहेत. त्या विभागाकडे 5 लाख 78 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद आहे. मिळकतींच्या क्षेत्रफळानुसार विभागाकडून कर आकारणी केली जाते.

नियमबाह्य पद्धतीने मिळकत हस्तांतरण
दरम्यान, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कुलमुखत्यार पत्र आणि 500 रुपयांच्या नोटरी प्रतिज्ञापत्राद्वारे मिळकतींचे हस्तांतरण करून नोंद करू नये. तसेच, विभाजन व विभागणी करू नये असे आदेश 5 ऑक्टोबर 2019 ला काढले होते. तशा प्रकारे नोंद केल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, ते आदेश झुगारून नियमबाह्यपणे मिळकतींचे हस्तांतरण आणि विभागणी करण्याचे प्रकार तळवडे कर संकलन कार्यालयात घडले आहेत. ही बाब माहिती अधिकारी कायद्यानुसार मागविलेल्या कागदपत्रांमुळे उघड झाली आहे.

नियमानुसार कारवाई करणार
तळवडे कर संकलन कार्यालयात नियमबाह्यपणे काही मिळकतींची नोंद झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याबाबत चौकशी केली जात आहे. दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

Back to top button