नारायण पेठेत जिवंत देखाव्यावर भर; पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे अधिक; भाविकांची होतेय गर्दी | पुढारी

नारायण पेठेत जिवंत देखाव्यावर भर; पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे अधिक; भाविकांची होतेय गर्दी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी पुणेकर भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून, जिवंत देखाव्याला अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. नारायण पेठेतील अनेक मंडळांनी पौरोणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. नारायण पेठेतील नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने पावनखिंड हा जिवंत देखावा सादर केला आहे.

मंडळाचे अध्यक्ष परेश हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला असून, त्यामध्ये हिंद माता प्रतिष्ठानाचे तब्बल 18 कलाकार आपली कला सादर करीत आहेत. देखाव्यांना रात्री 12 पर्यंत परवानगी मिळाल्याने नऊ ते दहा वेळा हा पावनखिंडचा प्रसंग आम्ही गणेश भक्तांना दाखवू शकतो, असे ही हराळे यांनी या वेळी सांगितले.

नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाने भव्य मंदिर साकारले असून, त्यामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. मंदिराच्या मध्यभागी शंकराची मोठी मूर्ती, तर दोन्ही बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची मूर्ती उभारून ज्ञानपीठ मंदिर साकारले आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

गायकवाड तालीम मंडळाच्या वतीने मंदिराचा आकर्षक देखावा करण्यात आला आहे. मुंजाबाचा बोळ तरुण मंडळाच्या वतीने काली माता वध हा पौराणिक देखावा सादर केला आहे. माणिकप्रभू मित्र मंडळ आणि इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वतीने अशोक वनातील सीता मातेचा प्रसंग उभारण्यात आला आहे. नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने विविध शालेय वस्तूंचा वापर करून श्रींची प्रतिकृती साकारली असून, शालेय गणेश दाखविण्यात आला आहे.

आवर्जून पाहावे असे देखावे…
भोलेनाथ मित्रमंडळ
नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट
मुंजाबाचा बोळ तरुण मंडळ
माणिकप्रभू मित्रमंडळ

Back to top button