जुन्नर, खेड, दौंड, बारामती, शिरूर, इंदापूरला सर्वाधिक ई-केवायसी प्रलंबित | पुढारी

जुन्नर, खेड, दौंड, बारामती, शिरूर, इंदापूरला सर्वाधिक ई-केवायसी प्रलंबित

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यात जुन्नर, खेड, दौंड, बारामती, शिरूर, इंदापूर या तालुक्यात सर्वाधिक ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून मिळाली. तरी जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास योजनेंतर्गत मिळणारे मानधन बंद होणार आहे.

शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून योजनेंतर्गत निश्चित केलेल्या निकषांप्रमाणे पात्र शेतकरी कुटुंबीयास दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ मिळतो. पीएम-किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. ती आता वाढवून 7 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

ई-केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पध्दतीने तुमची ओळख पडताळून पाहिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकर्‍यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण 4 लाख 98 हजार 278 शेतकर्‍यांपैकी 3 लाख 38 हजार 415 शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे. उर्वरित 1 लाख 59 हजार 863 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रलंबित असलेल्या ई-केवायसीची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आंबेगाव 10 हजार 354, बारामती 16 हजार 14, भोर 6 हजार 614, दौंड 17 हजार 28, हवेली 9 हजार 211, इंदापूर 13 हजार 897, जुन्नर 20 हजार 90, खेड 19 हजार 254, मावळ 6 हजार 821, मुळशी 9 हजार 74, पुरंदर 12 हजार 164, शिरूर 15 हजार 754, वेल्हे 3 हजार 588 असे मिळून एकूण 1 लाख 59 हजार 863 शेतकर्‍यांचे ई-केवायसी बाकी असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button